पालिकेच्या खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार परिगणन करून थकबाकी देण्यात यावी असे आदेश पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
पालिकेच्या खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील ४९५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार १ एप्रिल २००५ ते ३१ जानेवारी २०१२ या कालावधी मधील थकबाकी देण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने २३ जुलै २०१३ ला परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात अंतिम परिगणन करून थकबाकी देण्यात येईल असे म्हटले होते. परंतू परिपत्रक काढून एक वर्ष झाले तरी अद्याप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप ३ ते ६ लाख रुपयांची थकबाकी मिळाली नव्हती.
यामुळे शिक्षक कर्मचारी संघटनेचे महेश खोत व महेश मुळमुळे यांनी शिक्षक समिती अध्यक्ष विनोद शेलार व आमदार आशिष शेलार यांच्याकाडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आशिष शेलार यांनी संयुक्त बैठक लावण्याची मागणी केली होती. या बैठकीमध्ये शिक्षक कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्यांची दखल घेत शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी अंतिम थकबाकी देण्याबाबत परिगणन करण्याचे आदेश दिले आहेत.