डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणार्या भव्य स्मारकासंबंधी केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत आठवले यांनी सहा महत्त्वपूर्व प्रश्न उपस्थित केले. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकासंबंधी रिपाइंने वारंवार पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारने स्मारकासंबंधी शपथपत्र देण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. संसदेत इंदू मिल हस्तांतरण विधेयक त्वरित मंजूर होणे आवश्यक आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे आठवले म्हणाले. संसदेच्या प्रांगणात भगवान गौतम बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी आठवले यांनी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील सीमावादावर तोडगा काढण्यास विलंब का होत आहे? असा सवाल राज्यसभेच्या शून्य प्रहरात आठवले यांनी उपस्थित केला.
याशिवाय राज्यघटनेचे सहावे शेड्युल अंमलात कधी आणणार, आदिवासीबहुल विभाग व त्या जवळच्या परिसरात सहावे शेड्युल कधी लागू करणार, कोणत्या राज्यांनी हे शेड्युल लागू केले आहे, हे प्रश्न आठवले यांनी उपस्थित केले. दलितांवर आणि आदिवासी महिलांवर होणार्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करण्याबाबत संसदेत विस्तृत चर्चा घडविण्याची मागणी आठवले यांनी राज्यसभेत केली.