मुंबई - अंधेरी येथील "लोटस बिझनेस पार्क‘मधील अग्निप्रतिबंधक यंत्रणाच कुचकामी नव्हती, तर इमारतीत मूळ आराखड्यापेक्षा अनेक बदल करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघड झाले आहे. यामुळे या इमारतीविरोधात मंगळवारी (ता. 22) एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी "लोटस बिझनेस पार्क‘ला लागलेल्या आगीची पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे. पालिकेचा इमारत प्रस्ताव विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाकडून रविवारपासून (ता.20) इमारतीची तपासणी सुरू झाली. इमारतीत अनेक अंतर्गत बदल करण्यात आले असल्याने या इमारतीच्या विकसकाविरोधात किंवा सोसायटीविरोधात मंगळवारी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.
आगीच्या वेळी अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेने या इमारतीचे ताबा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र सोमवारी या इमारतीला पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्याप हे पत्र पाठवलेले नसले तरी ही इमारत वापरण्यासाठी बंद करण्यात आली आहे.
दोन दिवसांत अहवाल
इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असलेल्या सर्व्हर रूममध्ये आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते. फायर अलार्म काम करत असते तर आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. सध्या सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल दोन दिवसांत पालिकेला सादर करण्यात येणार आहे.
दोन दिवसांत अहवाल
इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असलेल्या सर्व्हर रूममध्ये आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते. फायर अलार्म काम करत असते तर आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. सध्या सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल दोन दिवसांत पालिकेला सादर करण्यात येणार आहे.
इवलेकरांच्या पत्नीला परिचारिकेची नोकरी या आगीत मृत्यू झालेले नितीन इवलेकर यांच्या पत्नीला पालिकेने बोरिवली येथील भगवती किंवा जोगेश्वरी येथील रुग्णालयात परिचारिकेच्या नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी समाजातूनही मदतीचे हात पुढे आले आहेत.
तेरावा मजलाच नाही अनेक आयटी कंपन्यांची कार्यालये, बडे विकसक आणि अभिनेता हृतिक रोशनचे कार्यालय असलेल्या या इमारतीत अंधश्रद्धा मात्र फोफावल्याचे दिसते. या इमारतीत 13 वा मजलाच नव्हता. 12 व्या मजल्यानंतर थेट 14 वा मजला मोजला जात होता. 13 हा अशुभ आकडा मानला जात असल्याने हा मजला गाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.