मुंबई - समुद्रात कसले शिवस्मारक उभारता, पहिल्यांदा पडझड होत असलेल्या किल्ल्यांचे जतन करा, अशी ठाम भूमिका मांडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला होता. मात्र, आता त्यांच्याच पक्षातून पुतळा उभारण्याची मागणी होत आहे.
मनसेचे नगरसेवक दीपक पवार यांनी वांद्रे टर्मिनससमोरच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. तशा ठरावाची सूचना त्यांनी महासभेत मंगळवारी (ता. 29) मांडली. सर्व राजकीय पक्षांकडून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी होत असताना राज ठाकरे यांनी याला विरोध केला होता. हे स्मारक उभारण्याऐवजी गडकिल्ल्यांचे जतन करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांचा हा सल्ला पक्षातील नगरसेवकांच्याच पचनी पडला नसल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे पक्षप्रमुखांचे आदेश धुडकावण्याची ही मनसेतील पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर बॅनर न लावण्याची तंबी दिली होती; मात्र त्यांची बॅनरबाजी आजही सुरू आहे.