रेल्वेची सेमी हायस्पीड सुसाट; सुरक्षिततेला प्राधान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

रेल्वेची सेमी हायस्पीड सुसाट; सुरक्षिततेला प्राधान्य


मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या सेमी हायस्पीड ट्रेनसाठी मध्य रेल्वेने नव्या योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोह्यापर्यंतच्या मार्गावर १६0 प्रतितास किमीने ही सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्यासाठी रुळांच्या बळकटीकरणापासून सुरक्षेच्या संदर्भात विविध योजना हाती घेण्यात येणार आहेत.२0१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात कोकण मार्गावर सीएसटी ते मडगावपर्यंत सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल-रोहा मार्गावर यापूर्वी मोठे अपघात झाल्यामुळे ही घोषणा प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी या मार्गावरील रुळांच्या बळकटीकरणाची आवश्यकता आहे. मध्य रेल्वेच्या विभागप्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. त्या वेळी सेमी हायस्पीड ट्रेनसंदर्भात सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात या मार्गावरील मेल-एक्स्प्रेसच्या वेगावर सुरक्षिततेच्या कारणावरून र्मयादा घालण्यात येते.

अशावेळी १६0 प्रतितास किमीने गाडी चालवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, याची चर्चा करण्यात आली. रुळांचे बळकटीकरण, वळणावळणांवर वेग कायम ठेवणे, दरडींची सुरक्षितता यावर भर देण्यात आला आहे. या मार्गावर बोगदे आणि वळणांवर सेमी हायस्पीडचा वेग कायम ठेवण्याच्या दृष्टीने इंजिनीयरिंग विभागापुढे मोठे आव्हान आहे. रुळांच्या बळकटीकरणाप्रमाणेच इतर सुरक्षिततेबाबतही विशेष लक्ष देण्याची सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी केली आहे. रोह्यापर्यंतच्या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनच्या अनुषंगाने सुरक्षिततेस सर्वात जास्त महत्त्व देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad