लोटसच्या गच्चीवर बेकायदा मजला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2014

लोटसच्या गच्चीवर बेकायदा मजला

पालिका अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई - अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क इमारतीच्या गच्चीवर बेकायदा मजला बांधण्यात आला आहे. इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील सर्व्हर रूममध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आगीचा भडका उडाल्याचे अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. 

लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीचा तपासणी अहवाल आज (सोमवारी) महापालिका प्रशासनाला सादर झाला. या इमारतीमधील आगप्रतिबंधक यंत्रणा कुचकामी ठरल्याचे उघड झाले होते. या इमारतीत बेकायदा मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आले होते, असे महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. इमारतीला 20 व्या मजल्यापर्यंतच परवानगी असताना गच्चीवर बेकायदा मजला बांधून तेथील कार्यालये विकण्यात आली, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील सर्व्हर रूममध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. वीजप्रणालीतील दोषामुळेच आग लागली, असे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांनी सांगितले. या इमारतीच्या गच्चीवर बेकायदा मजला बांधल्याचे तपासणीत उघड झाल्यामुळे महापालिकेचे काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या इमारतीला "ना-हरकत‘ प्रमाणपत्र देणारे अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आणि ताबा प्रमाणपत्र देणारे इमारत प्रस्ताव विभागातील अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS