मुंबई : अंधेरी (पश्चिम ) येथे लोट्स पार्क या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा एक जवान ठार झाला. जर पालिका प्रशासनाने त्यांना आवश्यक असलेली साधन सामग्री आधीच पुरवली असती तर कदाचित त्या जवानाचे प्राण वाचले असते. त्यामुळे स्थायी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे महानगर पालिका भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले .
लोटस पार्क च्या २१ व २२ मजल्यावर लागलेली भीषण आग विझवताना पालिकेला खूप कष्ट घ्यावे लागले होते. पलिकेकडे ६२ मीटर उंचीच्या शिड्या आहेत, पण मुंबईत सध्या गगनचुंबी इमारती बनत आहेत. या इमारतींना जर आग लागली तर गंभीर समस्या उद्भवते. त्यामुळे पालिकेने ९० मीटर पर्यंत उंचीच्या शिड्या घेण्याचा प्रस्ताव उद्याच्या स्थायी समितीत मंजुरी साठी आणला आहे. परंतु फ़क़्त उंच शिड्या घेऊन उपयोग नाही, आपला जीव धोक्यात घालून आग विझवताना जवानांना आग विझवण्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्र सामुग्री देण्यात यावी, अशी मागणी मनोज कोटक यांनी केली. पालिका प्रशासनाकडे आपण भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्या इमारतीत आग प्रतिबंधक कोणतीही उपाय योजना नसताना अधिकार्यांनी जवानांना त्या ठिकाणी जबरदस्तीने का पाठवले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे .