रेसकोर्सवरील टर्फ क्‍लबची मक्तेदारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

रेसकोर्सवरील टर्फ क्‍लबची मक्तेदारी

मुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील "थीम पार्क‘चे घोडे अडलेले असताना पालिका प्रशासनाने टर्फ क्‍लबची मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोटभाडेकरू ठेवल्याने वादात सापडलेल्या टर्फ क्‍लबला अभय देण्यासाठी मक्तेदारांना पोटभाडेकरू ठेवण्याची परवानगी देण्याचे धोरण प्रशासनाने तयार केले आहे. 

पालिकेने अनेक मोक्‍यांचे भूखंड विविध संस्थांना मक्‍त्यावर दिले आहेत. या भूखंडांवर पोटभाडेकरू ठेवण्याची परवानगी नाही. मात्र, महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न टर्फ क्‍लबने रेसकोर्सवरील काही भागावर पोटभाडेकरू ठेवले होते. यावरून मोठा राजकीय वादंग उभा राहिला होता. नियमाचे उल्लंघन केल्याने क्‍लबला नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कारवाईचे घोडे अडले. सध्या टर्फ क्‍लबचा करार संपला आहे. हा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर थीम पार्क उभारण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. मात्र, राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने हा भूखंड अद्याप त्या क्‍लबच्याच ताब्यात आहे. शिवसेनेने महासभेत ठराव करून थीम पार्कची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवली होती. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन हा भूखंड पालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. अशा वेळी पालिकेने टर्फ क्‍लबचे घोडे दामटण्यासाठी पहिले पाऊल उचलल्याचे दिसत आहे. 

सुधार समितीसमोर मसुदा 
भाडेकरूंनी पोटभाडेकरू ठेवण्याबाबत महापालिकेचे कोणतेही धोरण नसल्याने असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात अडचणी येत असल्याची सबब पुढे करीत पोटभाडेकरू ठेवण्याची परवानगी देण्यासाठी नवे धोरण ठरवण्यात आले आहे. या धोरणाचा मसुदा सुधार समितीपुढे मांडण्यात आला आहे. मात्र, हे धोरण फक्त टर्फ क्‍लबला डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आले असल्याची चर्चा आहे. टर्फ क्‍लबला अभय देण्यासाठी हे पहिले पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS