मुंबई, (प्रतिनिधी)- मिठी नदी आणि वाकोला नाल्यात सोडण्यात येणार्या मलनिःसारण वाहिनीत बदल करण्याचा पालिकेने विचार केला आहे. यासाठी संकल्पचित्र तयार करण्यात येणार असून ही जबाबदारी पालिकेने भारतीय प्रौद्योगिक संस्थेला दिली आहे. हा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला असून या चित्रावर पालिका 80 लाख रुपये खर्च करणार आहे.
मिठी नदी आणि वाकोला नाल्यामधील बिनपावसाळी प्रवाहाचा मार्ग वळवून तो पालिकेच्या मलनिःसारण व्यवस्थेस जोडण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी मिठी नदी आणि वाकोला नालाक्षेत्रातील इतर मोठय़ा नाल्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. याबाबत भारतीय प्रौद्योगिक संस्थेने मिठी नदी व वाकोला नाल्याचे डिसेंबर 2013 साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण केले होते. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण मंडळाने दिले होते. त्याचबरोबर 25 लाख रुपयांचे बंकेचे हमीपत्र प्रशासनाला सादर करण्याची सूचना केली होती.
यामुळे मिठी नदी व वाकोला नाला यामध्ये होणारे जलप्रदूषण थांबविण्याकरीता भारतीय प्रौद्योगिक संस्थेने कंबर कसली असून तांत्रिक सेवेद्वारे नियंत्रण मिळविण्यासाठी संकल्पचित्र बनविण्यात येणार आहे. हे चित्र बनविण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. याकरीता 80 लाख रूपये खर्च केले जाणार असून येत्या बुधवारी स्थायी समितीत या प्रस्तावावर चर्चा केली जाणार असून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.