मुंबई : मुंबई मध्ये फेरीवाल्यांची नोंदणी सर्वेक्षण अभियान सुरु असले तरी फॉर्म भरणाऱ्या सर्वांनाच फेरीवाला परवाना मिळणार नाही. तर त्यांच्याकडे असलेल्या कागद पात्रांची पूर्ण पडताळणी करूनच त्यांना फेरीवाला परवाना देण्यात येणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्थायी समितीत सांगितले.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरु केल्यावर मुंबई मध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या फॉर्म मधून पालिका फक्त पैसा कमवत आहे, असा आरोप भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमल बजावणी केली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली .
तसेच या सर्वेक्षणावेळी फॉर्म कितीही लोकांनी भरले असले तरी पुरावा असणे गरजेचे आहे . फोरम सोबत इतर पुरावा असणेही गरजेचे आहे. फॉर्मसोबत मुंबई मधील रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र जमा करणेही बंधन कारक आहे. फेरी वाल्यांना हे सर्व पुरावे ९ ऑक्टोबर २०१३ च्या पूर्वीचे द्यायचे आहेत. ज्या फेरीवाल्यांनी जे पुरावे दिले आहेत व नव्याने जे पुरावे दिले आहेत , त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. फॉर्म भरलेल्यांपैकी नवीन फेरीवाल्यांना धंदा करायचा असल्यास वेगळे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नॉन हॉकिंग झोन व हॉकिंग झोन वेगवेगळे केलेले नसल्याने फेरीवाले जास्त प्रमाणात आल्यास सकाळ व संध्याकाळ धंदा लावण्याची त्यांना वेगवेगळी परवानगी देण्यात येणार आहे. फॉर्म भरलेल्या व्यक्तीने हा फॉर्म स्वत वार्डात जाऊन जमा करायचा असून त्यांची बायोम्याट्रिक नोंदणी केली जाणार आहे. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली असून अशा ठिकाणच्या पालिका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे अडतानी यांनी सांगितले.