राणे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2014

राणे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा


काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून काही ना काही कारणाने सतत अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अखेर पक्षावर आपला 'राग' काढला. यापूर्वीच घोषणा केल्यानुसार राणे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणेंनी उगारलेल्या या अस्त्रामुळे आधीच गर्भगळीत झालेल्या काँग्रेसला दणका बसला आहे. मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणे यांना या पदाने दोनदा हुलकावणी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर तरी आपल्याला ही संधी मिळेल, अशी अपेक्षा राणेंना होती. सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातील पक्षांतर्गत नाराजी 'कॅश' करण्यासाठी त्यांनी फिल्डिंगही लावली होती. मात्र, पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याचे संकेत दिल्याने राणे यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याची परिणती मंत्रिपदाच्या राजीनाम्यात झाली.

राणे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला. आजही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणे आपल्या निर्णयावर ठाम राहत राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. मात्र, राणेंचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही राणे यांनी आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांचा काँग्रेसमधील 'मुक्काम' नेमका किती दिवस असेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. थोड्याच वेळात राणे स्वत: पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी ते नेमके काय बोलतात, कोणाला लक्ष्य करतात, याबाबत उत्सुकता आहे.

Post Bottom Ad