मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेची कार्यालये आस्थापना, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसूतिगृह इत्यादी ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आणण्यास बंदी घालण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य समितीने घेतला आहे. या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची मंजुरी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या सभागृहात आणला असून त्याला मंजुरी मिळणार आहे.
भारतात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगामुळे १ दशलक्ष लोकांचा मृत्यू होत असतो. मुख कर्करोग हा कर्करोगातील आढळणारा सहावा कर्करोग आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये ४० टक्के प्रमाण हे मुख कर्करोगाचे आहे. त्यापैकी ७५ टक्के रुग्ण हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. प्रतिवर्षी ३० हजार रुग्णांमध्ये मुखकर्करोगाचे निदान आढळते. सदर प्रमाण पुरुष व स्त्री यामध्ये २:१ असे आहे आणि ४० वर्षांवरील पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
आपत्कालीन, दुर्घटना, अपघात, यामुळे पालिका रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना भेट देण्यासाठी मंत्री, राजकीय प्रतिनिधी येत असतात. अश्या लोकांकडून आणि मिडियामधून पालिकेच्या रुग्णालयाच्या अस्वच्छतेबाबत वारंवार टिकेची झोड उठवण्यात येत असते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना थुंकल्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका असतो. तसेचपालिकेच्या इतर कार्यालयात तंबाखूवर बंदी आणल्यास मुख कर्करोगाचे प्रमाण कमी करता येईल यामुळे पालिकेच्या अखत्यारीतील सर्व आस्थापनांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला आरोग्य समितीने मंजुरी दिली असून बुधवारी सभागृहात या निर्णयावर शिक्कमोर्तब केले जाणार आहे.