मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, रेल्वे लेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, रेल्वे लेट

मुंबई : मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार सुरुच आहे. कल्याण, डोंबिवली परीसरात पावसाचा जोर जास्त आहे. दरम्यान लोकल ट्रेन उशिरानं धावतायेत. हार्बर मार्गावर १० मिनिटे तर मध्य मार्गावर ट्रेन १५ मिनीटे उशिरानं धावतायेत. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी आज उशीर होऊ शकतो. 

ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातही दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या काही तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय. मुंबई शहरात गेल्या 24 तासांत 28.03 मिमी पावसाची नोंद झालीय. पूर्व उपनगरात 61.35 मिमी तर पश्चिम उपनगरांत 60.66 मिमी पावसाची नोंद झालीय. धरण क्षेत्रात परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असून 24 तासांत सव्वा लाख दशलक्ष लिटरची भर पडलीय.


पालघर डहाणु परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय. सुर्या आणि वैतरणेला पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शहरातला इराणी पूल पाण्याखाली गेलाय. त्यात दोघेजण अडकले होते. मात्र त्यांना वाचवण्यात यश आलंय. 
दोनजण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. पालघरमध्ये सोनावे गावात दहा वर्षांचा पंकज बोंबाडे वाहून गेलाय. तर डहाणुमध्ये रमेश भोगेही पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. सुर्या नदीवरचा मासवण पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळं मुख्य रस्त्यावरची वाहतूक ठप्प आहे. पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 
पावसाळी पिकनीकसाठी कोंडेश्वर इथे आलेले २० पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून बसले होते. मात्र या सर्व पर्यटकांची स्थानिक ग्रामस्थ, कुळगांव पोलीस आणि कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलाने सुखरुप सुटका केली. 
बदलापूर, कल्याण, ठाणे आणि मुंबई येथील पर्यटक सुट्टी निमित्त कोंडेश्वर येथे आले होते. मात्र सकाळपासूनच पावसाची संततधार असल्याने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढत गेला. आणि पर्यटकांना परतण्यात अडचणी येऊ लागल्या मात्र इतर पर्यटकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने याप्रकरणी पोलीसांना कळवलं आणि त्यामुळे त्यांची सुटका होऊ शकली. 

मुंबईत कालच्या एका दिवसात 34 दिवस पुरेल एवढा पाऊस झाला आहे.
  • तानसा तलाव – 276 मिमी
  • मोडकसागर तलाव – 216 मिमी
  • भातसा तलाव – 247 मिमी
  • अप्पर वैतरणा – 145 मिमी
  • मध्य वैतरणा – 107 मिमी
मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, रेल्वे लेट
mumbai locals

Post Bottom Ad

JPN NEWS