"चैत्यभूमी" नावाला केला होता विरोध
आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप
मुंबई / अजेयकुमार जाधव
मध्य रेल्वेच्या दादर येथे भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी हे स्मारक आहे. यामुळे गेले कित्तेक वर्षे दादर रेल्वेस्थानकाला "चैत्यभूमी‘ असे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षांच्या वेगवेगळ्या गटांनी व आंबेडकर जनतेने केली होती; परंतु त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. परंतू आता त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाने वांद्रे टर्मिनसला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे असल्याने नामांतराबाबत असलेली आपली भूमिका बदलली का असा प्रश्न आंबेडकरी जनतेमधून विचारला जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर मुंबई मधील रुग्णालय, शहराचे प्रवेशद्वार, मुख्य रस्ता, शाळा यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे प्रस्ताव संमत करण्याचा धडाका शिवसेनेने लावला आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील पहिल्या ट्रॉमा केअर रुग्णालयाचे नामकरण "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल‘ असे करण्यात आल्यानंतर अनेक वास्तूंना शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात आले आहे. हे सर्व प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिले होते. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक दीपक पवार यांनी, वांद्रे टर्मिनसचे नामकरण "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे टर्मिनस‘ करावे, अशी ठरावाची सूचना पालिका सभागृहामध्ये मांडली आहे. सभागृहामध्ये चर्चेसाठी येणाऱ्या या सूचनेमुळे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोंडीत सापडली आहे. हि सूचना मंजूर केल्यास नामकरणाचे श्रेय मनसेला जाईल आणि फेटाळल्यास बाळासाहेबांचे नाव देण्यास शिवसेनेचाच विरोध असल्याचा समज होईल, अशी गोची शिवसेनेची झाली आहे.
एकीकडे शिवसेनेची गोची करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरे यांना मात्र आपले नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत असताना आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला होता याचा विसर पडलेला दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक असलेल्या "चैत्यभूमी"चे नाव दादर स्थानकाला देण्यास मनसेने विरोध केला होता याचा राग आजही आंबेडकरी जनतेमध्ये आहे. त्यातच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वांद्रे स्थानकाला देण्याचा प्रस्ताव महानगरपालिका सभागृह मध्ये मंजुरीसाठी आला असताना राज ठाकरे हे सुद्धा गप्प बसले आहेत. यामुळे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एक न्याय आणि बाबासाहेब आंबेडकर यांना एक न्याय लावत असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.