मुंबई - आग विझवण्याच्या पद्धतीपैकी एक स्प्रिंकलर सिस्टिम. मिनिटाला 70 लिटर पाणी प्रभावीपणे शिंपडण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. पण "फायर ऑडिट‘च्या निमित्ताने होणाऱ्या तपासणीत अवघ्या चार टक्के इमारतींतील स्प्रिंकलर यंत्रणा सुरू असते, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.
एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर स्प्रिंकलर यंत्रणा सुरू असेल तर 90 टक्के आग पसरण्याआधीच विझू शकते. पण अशा यंत्रणांची सातत्याने तपासणीच होत नाही. त्यामुळेच आपत्कालीन स्थितीत ही यंत्रणा उपयोगी ठरत नाही, असे अग्निशमन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच आग प्रतिबंधक यंत्रणेच्या मूलभूत गोष्टीही सातत्याने तपासल्या तरी मोठ्या प्रमाणावर आग टाळता येते. राज्यभरात फायर ऑडिट करणाऱ्या चारशेहून अधिक त्रयस्थ संस्थांची नेमणूक झाली आहे. अग्निशमन विभागाकडूनही मोघम पद्धतीने सातत्याने इमारतींचे फायर ऑडिट होत असते. पण तुलनेत कॉर्पोरेट हाऊस, सरकारी किंवा खासगी आस्थापना व निवासी सहकारी संस्थांकडून ऑडिटची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडली जात नाही.
अग्निशमन विभागाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पुढाकारानंतर "यूएफओ‘च्या मदतीने 20 लाखांचा खर्च करून ऑडिटविषयी जनजागृती करणाऱ्या जाहिराती सर्व चित्रपटगृहांत दाखवण्यात आल्या. अनेक स्वयंसेवी संस्थांनी या जाहिरातींसाठी पैसा उभा केला खरा; पण इतका लाखमोलाचा खटाटोप करूनही एकाही संस्थेकडून फायर ऑडिटसाठी साधी विचारपूसही झाली नाही, ही शोकांतिका आहे.