मुंबई - फेरीवाल्यांच्या घुसखोरीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिकेने सर्वेक्षण सुरू केल्यापासून त्यांची संख्या अचानक वाढू लागल्याने मनसे मैदानात उतरली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.21) पालिका आयुक्तांची भेट घेऊन हे सर्वेक्षण न थांबवल्यास मंगळवारपासून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा इशारा दिला.
फेरीवाला धोरण राबवण्यासाठी पालिकेने शुक्रवारपासून (ता.18) शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तेव्हापासून मुंबईतील फेरीवाल्यांची संख्या अनेक पटीने वाढू लागल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या नियमाप्रमाणे सर्वेक्षणाच्या वेळी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला फेरीवाला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी तर केवळ खोके घेऊन कोणालाही उभे केले जात आहे. या सर्वेक्षणाला मनसेने शनिवारपासून (ता.19) विरोध करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पालिकेकडून लोकसंख्येच्या अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याआधारे मुंबईत तब्बल अडीच लाख फेरीवाले होतील.
दादर आणि वांद्रे परिसरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण मनसेने थांबवल्यानंतर विधानमंडळातील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर आणि पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्यासह नगरसेवक आणि विभाग अध्यक्षांनी सोमवारी आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. हे सर्वेक्षण करताना नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. तसेच आचनक फेरीवाले वाढल्यामुळे हे काम तत्काळ थांबावावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले; मात्र हे सर्वेक्षण तत्काळ न थांबवल्यास अधिकाऱ्यांना डांबून ठेवू, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.