जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2014

जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई / मुकेश धावडे 
जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌, जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टस्‌सह औरंगाबाद आणि नागपूर येथील कला महाविद्यालयांतील कंत्राटी शिक्षकांचे करार रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले आहे. 

अप्लाईड आर्टस्‌, फोटोग्राफी, पेंटिंग, स्कल्पचर, मेटल, टेक्‍स्टाईल, इंटेरियर, सिरॅमिक, शिल्पकला या अभ्यासक्रमांत अग्रगण्य असलेल्या जे. जे. स्कूलमध्ये काही वर्षांपासून कंत्राटी शिक्षक आहेत. सध्या तेथे 10 कायमस्वरूपी शिक्षक आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभाग दर वर्षी 11 कंत्राटी शिक्षक घेते. या शिक्षकांची मुदत 30 मार्चला संपली. त्यांच्या नव्या कराराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. 21 जुलैपासून कॉलेज सुरू झाले आहे; परंतु शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
157 वर्षांच्या जुन्या जे. जे. स्कूलमध्ये अकबर पदमसी, जतीन दास, आर. व्ही. सुतार, आर. के. जोशी, काशिनाथ साळवे, एम. व्ही. धुरंधर, बाबूराव पेंटर, बाबूराव सडवेलकर, वासुदेव कामत, अच्युत पालव, नितीन देसाई आदी दिग्गज शिकले. आता तिथे शिक्षक नसल्याने महाविद्यालयाच्या आवारात बसण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे 11 जूनला प्रवेश घेतलेल्या सुमारे 450 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाविद्यालयाने फेब्रुवारीत शिक्षकांच्या कराराचा प्रस्ताव कला संचालनालयाकडे नूतनीकरणासाठी पाठवला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जादा पैसे मोजून व्हिजिटिंग शिक्षक नेमण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारी नियमानुसार, 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा लागतो. तरीही येथे 450 विद्यार्थ्यांसाठी फक्त 11 कंत्राटी आणि 10 कायमस्वरूपी शिक्षक असतात. अप्लाईड आर्टस्‌मध्ये इलस्ट्रेशन, फोटोग्राफी, टायपोग्राफी, ग्राफिक्‍स या विभागांत जवळपास 12-13 प्राध्यापकांची कमतरता आहे. मेटल आणि टेक्‍स्टाईलसाठी एकही प्राध्यापक नाही.

Post Bottom Ad