मुंबईत दोनशेहून अधिक उत्तुंग इमारती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2014

मुंबईत दोनशेहून अधिक उत्तुंग इमारती

मुंबई - गगनचुंबी इमारती धडाक्‍याने बांधल्या जात आहेत. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, कॉर्पोरेट कंपन्या, चित्रपटगृहे व व्यावसायिक वापरासाठी मुंबईत या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींत अग्निशमन कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बिल्डर आणि अग्निशमन दलाचे अधिकारी नियम पायदळी तुडवीत आहेत. त्यामुळे या इमारती अग्निशमन दलाच्या जवानांच्या मृत्यूचे सापळे बनू लागल्या आहेत. मुंबईत 20 मजल्यांपर्यंतच्या दोनशेहून अधिक इमारती आहेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
लोअर परळ, लालबाग, एल्फिन्स्टन, प्रभादेवी, अंधेरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स, नरिमन पॉईंट, कफ परेड, दादर, वरळी, मालाड, कांदिवली, साकीनाका, पवई, मुलुंड, भांडुप आदी ठिकाणी मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आणि व्यावसायिक वापराच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. गिरण्यांच्या जागांवरही अशा इमारती उभ्या आहेत. ठिकठिकाणी आता विकसक "एसआरए‘च्या इमारतीही बांधत आहेत. त्याही 15 ते 20 मजली आहेत. 

इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देताना इमारतींचे "फायर ऑडिट‘ केले जाते, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे. मात्र इमारतींची फक्त तपासणी होते. फायर ऑडिट होतच नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

रिफ्युज एरिया, इमारतीच्या चारी बाजूंना अग्निशमन दलाची गाडी फिरवण्यासाठी जागा, फायर एक्‍झिट जिना, फायर लिफ्ट, फायर लिफ्टला इमारतीच्या विद्युत पुरवठ्याऐवजी पर्यायी विद्युत पुरवठा आदी गोष्टींचा निकषांत अंतर्भाव आहे. फायर लिफ्टचा वापर सध्या सर्वांसाठी केला जातो. या निकषांची दलाचे प्रशासकीय अधिकारी आणि विकसक पायमल्ली करतात, असे दिसून येते. 

Post Bottom Ad