मुंबई : मुंबई महानगरपालिकेतून विकासकांच्या फाईल्स गायब होण्यामागे महापालिकेतील प्रशासन व विकासक यांचे संगनमत कारणीभूत असून, त्यांच्यातील भ्रष्टाचारामुळेच या फाईल्स गायब झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी माजी प्रमुख अभियंता (विकास व नियोजन) अशोक शिंदे यांची चौकशी केल्यास संपूर्ण सत्य उघडकीस येईल. तसेच या प्रकरणात पालिका अधिकार्यांचा हात असून, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे तसेच पालिका अधिकारी आणि विकासकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सीएसटी रोड, सांताक्रुझ (पूर्व) येथे अनेक अनधिकृत इमारतींची बांधकामे झालेली असून, याबाबत अनेकदा तक्रारीही देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. यामध्ये ठराविक विकासकांच्याच फाईल्स चोरीला गेलेल्या आहेत. यामध्ये आनंद पंडित, विजय ठक्कर यांच्या सांताक्रुझ, विलेपार्ले, खार, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी या ठिकाणच्या अनधिकृत इमारतींच्या फाईल्सचा समावेश आहे. विकासक व पालिका अधिकारी यांच्या संगनमताने तत्कालीन पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या सेवानवृत्तीनंतर त्यांच्या खोट्या व बनावट सह्या करून तसेच झेरॉक्स प्रतीवर मंजुरी देऊन अनधिकृत इमारती उभारण्यात आल्याचे आरोप लांडे यांनी केला आहे. त्यामुळे या फाईल्स चोरीच्या घटना घडण्याचे लांडे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment