मुंबई- बेस्टच्या १४२ रंगांधळ्या चालकांपैकी ७० चालकांना गाडी चालवण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांपैकी ५० चालकांना सेवेत रुजूही झाले आहेत. जे. जे. रुग्णालयातील ऑप्टल मेडिकल बोर्डमार्फत या चालकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १२० जणांचे अहवाल मिळाले असून, त्यातील ७० चालक हे गाडी चालवण्यास पात्र ठरले. उर्वरित ४९ चालकांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. मात्र अपात्र चालकांनाही सेवेत घेणार असल्याचे बेस्टच्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, १४२ कुटुंबांचे पुढे काय प्रगती झाली आहे याची साधी कल्पनाही बेस्टच्या अध्यक्षांना नसल्याने कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली.
बेस्टचे १४२ चालक रंगांधळे असल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर त्यांना आपली नोकरी सोडावी लागली होती. त्यांना सेवेत समावेश करून घ्यावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले. त्यानुसार त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर ७० चालकांना गाडी चालवण्यासाठी बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र ४९ जण अपात्र ठरले आहेत. त्यांना वाहक म्हणून पर्यायी नोकरी देण्याचा विचार सध्या सुरू आहे. तर २० जणांना नोकरीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, एवढी मोठी उलाढाल बेस्टमध्ये होत असताना बेस्टच्या अध्यक्षांना त्याची कल्पनाच नव्हती. रंगआंधळे चालकांच्या प्रकरणाची स्थिती जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही चालकाला कामावर घेतलेले नाही. तसेच कोणाचीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. काही अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या अज्ञानाचे खापर अधिका-यांवर फोडले.
No comments:
Post a Comment