मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणीची बाग) प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यास महापौर सुनील प्रभू यांनीही विरोध दर्शवला आहे. यासंबंधी महापौरांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. या अगोदरच स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राणीच्या बागेच्या स्थलांतरास विरोध दर्शवला आहे.
पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी किंवा बोरिवलीच्या नॅशनल पार्क येथे राणीची बाग स्थलांतरित करण्याचा घाट राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घातला आहे. मुंबई टुरिझम विकास आरखड्यात याबाबतचा उल्लेखही करण्यात आला आहे, मात्र मनपाने याअगोदरच राणीच्या बागेच्या विस्तारीकरणासंबंधी एक आराखडा तयार केला आहे. विस्तारीकरणासाठी उद्यानाच्या शेजारी असलेल्या ७ एकर भूखंड मफतलात कंपनीकडून ताब्यात घेण्यात आला आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात प्राणी संग्रहालयाच्या आणि उद्यानाच्या विकासाकरिता जवळपास ३00 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. उद्यानाच्या विकासासाठी सल्लागाराने तयार केलेल्या आराखड्यात केंद्र सरकारच्या प्राणी संग्रहालय प्राधिकार आणि राज्य सरकारचा पुरातन वास्तू विभाग यांची परवानगी मिळण्यास विलंब झाला होता. या कारणास्तव विस्तारीकरणाचे काम सुरू होण्यास उशीर झाला होता. या कामासाठी आतापर्यंत पालिकेने दीडशे कोटी रुपये खर्च केले आहेत.या परिस्थितीत राणीची बाग येथील प्राणी संग्रहालय बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा गोरेगाव येथील आरे कॉलनीत स्थलांतर केल्यास कोट्यवधी रुपये पाण्यात जातील. त्यामुळे राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येऊ नये, अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
No comments:
Post a Comment