मुंबई- बेस्टच्या सर्वच बस लवकरच सीसी टीव्ही कॅमे-यांनी सज्ज असतील. आतापर्यंत बेस्टच्या तीन हजार ८०० बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, उर्वरीत २०० बसमध्ये ऑगस्ट महिन्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावले जातील, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच १५०० बसमध्ये जीपीएस यंत्रणाही बसवली जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी बसवण्यात आलेले दहा टक्के सीसी टीव्ही कॅमेरे रोज खराब होत असल्याचे समोर आले आहे. त्यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने या कॅमे-यांची देखभाल करणेच बेस्टला अवघड झाले आहे. त्यात आणखी २०० कॅमे-यांची भर पडणार आहे.
बेस्ट बसमध्ये २००७ पासून सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने हे कॅमेरे बसवण्यात आले. आता शेवटचा टप्पा आहे. मुंबईतले रस्ते, धूळ आणि चालकांची गाडी चालवण्याची पद्धत पाहता सुमारे एकशे दहा कॅमे-यांमध्ये दररोज काहीना काही बिघाड होतच असतो. ही मोठी समस्या बेस्टसमोर असून, त्यावर कशी मात करायची याची चिंता प्रशासनाला आहे. ती समस्या सोडवण्याला बेस्टने प्राधान्य दिले पाहिजे, असे बोलले जात आहे. दरम्यान, १५०० बसमध्ये बसवल्या जाणा-या जीपीएस यंत्रणेमुळे बस नेमकी कुठे आहे, ती किती वेळात स्थानकात पोहोचेल, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment