मुंबई पालिकेच्या जलवाहिन्या टाकण्यास वज्रेश्वरीमधील शेतकर्‍यांचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2013

मुंबई पालिकेच्या जलवाहिन्या टाकण्यास वज्रेश्वरीमधील शेतकर्‍यांचा विरोध

मुंबई महानगरपालिकेतर्फे या परिसरातील काही गावांतून मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सहावी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यात शेतकर्‍यांवर अन्याय केला जात असून शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काम थांबवावे, अशी मागणी श्रमिक शक्ती संघटनेचे अध्यक्ष देवीदास पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रा. वि. भुस्कुटे, सचिव दशरथ वळवी, मिलिंद पाटील, जानू सांबरे आदींनी केली आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा तलावातून आलेल्या पाइपलाइन या ब्रिटिश काळातल्या असून त्यात महानगरपालिकेतर्फे सहावी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यामध्ये येथील खेबाळा, अघई, दुधनी, गवरदेव पाडा-पाडे, शिरगाव व परिसरातील अनेक गावपाड्यांतील शेतकर्‍यांच्या जमिनी यामध्ये बाधित होत आहेत. 

यासंदर्भात येथील श्रमिक शक्ती संघटनेने उपोषण करून शेतकर्‍यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. भूसंपादन कायद्याप्रमाणे त्या जमिनी आजही संपादित न करताच कामे सुरू आहेत. ती प्रथम थांबवावीत व भूसंपादन कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या जाव्यात. तसेच सन १९२५ साली जी पाइपलाइन गेली ती जागा भूसंपादन झाले नसल्याचे स्पष्ट झाले असताना देखील चौरसमीटर नुसार ठाणे जिल्ह्यातील उपनिबंधक यांच्याकडील २0१३ प्रमाणे मोबदला द्यावा, भातसा कालवा प्रकल्पात १९८६ साली काही जमिनी संपादन केल्या व काही ठिकाणी २९ वर्षे होऊनसुद्धा शेतीला पाणी मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी बारमाही पिकास मुकले आहेत. 

भातसा कालवा कॅनलचे अपूर्ण काम पूर्ण करून शेतीत पाणी द्यावे नाही तर या जमिनी पूर्ववत करून मूळ जमीन मालकास परत द्याव्यात, अशा प्रकारच्या विविध मागण्या मान्य न करताच मुंबई महानगरपालिकेने दंडेलशाही करत या परिसरातील शेतकर्‍यांवर अन्याय करून ही पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. तरी याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा शेतकर्‍यांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील संघटनेचे अध्यक्ष देवीदास पाटील, अर्जुन वळवी, नितीन गवारी, चंद्रकांत वाघे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad