पालिकेतील गायब फायली व पैशांच्या चौकशीची गरज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2013

पालिकेतील गायब फायली व पैशांच्या चौकशीची गरज

मुंबई महानगर पालिकेतील फाईल्स गायब होण्याचे प्रकार सुरूच असून पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील एकूण ९१५७ फायली आतापर्यंत गायब झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. पश्‍चिम उपनगरातील एच पूर्व/पश्‍चिम आणि के पूर्व/पश्‍चिम विभागातून ३४७४, पी दक्षिण/ उत्तर आणि आर दक्षिण/ मध्य/ उत्तर विभागातील १४०१ आणि एल, एस, टी, एम/पूर्व, एम/पश्‍चिम वॉर्ड कार्यालयातून ४२८२ फायली अशा एकूण ९१५७ फायली गायब झाल्या आहेत. तर ए, बी, सी, डी, ई, एफ दक्षिण/उत्तर आणि जी दक्षिण/उत्तर विभागातून गायब झालेल्या फायलीची माहितीच उपलब्ध झाली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. 

मुंबई महानगर पालिकेतून विकासकांच्या फाईल्स गायब होण्या मागे महापालिकेतील प्रशासन व विकासक यांचे संगनमत कारणीभूत असून, त्यांच्यातील भ्रष्टाचारामुळेच या फाईल्स गायब झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी माजी प्रमुख अभियंता (विकास व नियोजन) अशोक शिंदे यांची चौकशी केल्यास संपूर्ण सत्य उघडकीस येईल. तसेच या प्रकरणात पालिका अधिकार्‍यांचा हात असून, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे तसेच पालिका अधिकारी आणि विकासकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सीएसटी रोड, सांताक्रुझ (पूर्व) येथे अनेक अनधिकृत इमारतींची बांधकामे झालेली असून, याबाबत अनेकदा तक्रारीही देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. यामध्ये ठराविक विकासकांच्याच फाईल्स चोरीला गेलेल्या आहेत. यामध्ये आनंद पंडित, विजय ठक्कर यांच्या सांताक्रुझ, विलेपार्ले, खार, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी या ठिकाणच्या अनधिकृत इमारतींच्या फाईल्सचा समावेश आहे. विकासक व पालिका अधिकारी यांच्या संगनमताने तत्कालीन पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या सेवानवृत्तीनंतर त्यांच्या खोट्या व बनावट सह्या करून तसेच झेरॉक्स प्रतीवर मंजुरी देऊन अनधिकृत इमारती उभारण्यात आल्याचे आरोप लांडे यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांच्या फायली गहाळ होत असतानाच या खात्यांमध्ये रोज जमा होणारी रोख रक्कमही गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २००८ पासून मुंबईतील करदात्यांकडून वसूल केलेली ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा केली गेली नसल्याचा गौप्यस्फोट मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या ४३७ कोटींच्या रोख रकमेचा हिशेब मुंबई पालिकेला अद्यापही देता येत नसून हा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही त्रुटी आहे की लबाडी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई महापालिकेत वाटमारी करत महापालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकारी करत असल्याचे आरोप यापूर्वी अनेकदा झाला आहे.
२००७ पासून महापालिकेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाले असून याच कालावधीत सुमारे अडीच हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे व्हेरिएशनही झाले होते. या विरोधात विधिमंडळ अधिवेशनातही आवाज उठवला गेला होता. पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालातून आपले पितळ उघडे पडेल या भीतीमुळे पालिका प्रशासनाने २००७ पासूनचे लेखा परीक्षणासाठी पाठवले नव्हते. परंतु, आता महापालिकेने बनवलेल्या २००८च्या लेखा अहवालांमध्ये ४३७ कोटी रुपयांची ‘रोख रक्कम’ दाखवण्यात आली आहे. याच लेखा परीक्षण विभागाच्या टिप्पणीवरून आपण लेखा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही आपल्याला याचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे आपण याबाबत आयुक्तांनाच पत्र लिहून याची चौकशीची मागणी केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
२००८ सालापासून लेखा अहवालामध्ये ही ४३७ कोटी रुपयांची रक्कम रोख स्वरूपात दाखवली जात आहे. महापालिकेच्या नियमानुसार विविध विभागांमध्ये जमा झालेली रोख रक्कम ही बँकेत भरणे आवश्यक असते. या रोख रकमेतून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जात नाही. असे असताना ही ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम कोणत्याही बँकेच्या खात्यात का दाखवली गेली नाही, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. लेखा परीक्षकांनीच ही त्रुटी दाखवली असून महापालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध झालेल्या लेखा अहवालावरूनच ही बाब समोर आली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे.
यामुळे मुंबई महानगर पालिकेमधील फायली आणि पैशांना पाय फुटले कि काय अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. या गहाळ झालेल्या फायली आणि पैशांचा हिशोब पालिकेतील अधिकारी, विकासक, संबधित नगरसेवक, लोक प्रतिनिधी यांना मुंबईकर जनतेला द्यावाच लागणार आहे. पालिकेमध्ये गेले १७ वर्षे सत्ता आमची आहे असे म्हणणारे सत्ताधारी शिवसेना, भाजपा यांनाही आपली सत्ता असताना पालिकेमध्ये काय प्रकार चालू आहेत याची माहिती नसावी याचे आश्चर्य वाटत असले तरी या सर्व प्रकाराला सत्ताधारी असलेल्या सेना भाजपचा पाठींबा असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
पालिकेमध्ये ९१५७ फायली व ४३७ कोटी रुपये गायब झाले असताना पालिकेच्या प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा थांग पत्ता नव्हता असे होऊच शकत नाही. हजारो फायली आणि करोडो रुपये गायब झाले असताना पालिकेच्या आयुक्तांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर त्याचवेळी कारवाही करण्याची आवश्यकता होती. परंतू सदर प्रकार उघड होई पर्यंत कोणतीही कारवाही प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. सदर प्रकार उघड झाल्यावर आता कारवाहीच्या गोष्टी केल्या जात आहेत. याचाच अर्थ असा होतो कि जर हे प्रकार उघड झालेच नसते तर संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाने वाचवले सुद्धा असते. यामुळे हा भ्रष्टाचार पालिकेमधील वरच्या अधिकारी आणि पदाधिकार्यांपर्यंत पोहोचला असला असल्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंबईकर नागरिकांसमोर सत्य काय आहे ते समोर आणून दोषी लोकांवर कारवाही करण्याची गरज आहे. 
अजेयकुमार जाधव
Mob. No.- 09969191363 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad