नवी मुंबई : कोकण रेल्वेचे कार्यालय नवी मुंबईतून गोव्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला आहे. हे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा देतानाच कोकण रेल्वेची सुरुवात पनवेलपासून करावी, असे मत खा. डॉ. संजीव नाईक यांनी व्यक्त केले. ते कोकण रेल्वे कर्मचार्यांच्या विभागीय ओबीसी युनियन बेलापूर येथील कार्यालयाच्या उद््घाटनाप्रसंगी बोलत होते. त्या वेळी व्यासपीठावर अतिरिक्त पालिका आयुक्त संजय पत्तीवार, रामनाथ पाटील, मुख्य कार्मिक अधिकारी सिद्धेश्वर तेलगू, मुख्य अभियंता राजेंद्र कुमार आदी उपस्थित होते.
कोकण रेल्वेमध्ये सुमारे ४ हजार ७00 कर्मचारी कार्यरत असून, त्यामध्ये १ हजार ८८0 कर्मचारी हे ओबीसी आहेत. कोकण रेल्वेच्या या कर्मचार्यांची ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज युनियन कार्यरत आहे. या संघटनेने खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे अध्यक्ष बी. पी. तायल यांच्यासमवेत १२ डिसेंबर २0१२ रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत मांडल्या गेलेल्या विविध मागण्यांवर अल्प कालावधीतच पूर्ततेचे आश्वासन अध्यक्ष तायल यांनी दिले होते. त्यानुसार, ओबीसी युनियनच्या मागणीप्रमाणे त्यांना बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या कार्यालय आवारातच कार्यालय उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. त्या वेळी खासदार डॉ. नाईक यांनी कोकण रेल्वेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत कोकण रेल्वेने आपली स्वत:ची ओळख निर्माण केल्याचे सांगितले. ठाणे जिल्हादेखील पूर्वी कोकणाचाच भाग असताना सध्याच्या शहरीकरणाने तो मुंबईला जोडला गेला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची सुरुवात ही रोहाऐवजी पनवेलपासून व्हावी, अशी आपली इच्छा आहे. या पुढील ते आपले उद्दिष्ट राहणार असून पूर्णत्वासही नेऊ, असा विश्वास खा. डॉ. नाईक यांनी व्यक्त केला. कोकण रेल्वे घडवत असलेले तंत्रज्ञान हे मेट्रो रेल्वेसाठी उपयुक्त ठरेल आणि तसे झाल्यास प्रथम त्याचा नवी मुंबईत वापर करू, असे आश्वासन खा. डॉ. नाईक यांनी दिले. सागर नाईक यांनी कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय नवी मुंबईत असल्याचा आनंद व्यक्त करत कार्यालयासाठी हवी असलेली सध्याच्या महापालिका इमारतीजवळ रिक्त होणारी जागा देण्याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment