मुंबई : २५ जून रोजी झालेल्या पालिका सभेत शिवसेना नगरसेविकांकडून काँग्रेस नगरसेविकेस मारहाण करून असभ्य वर्तन करीत सभागृहाच्या पावित्र्याला हानी पोहोचवणार्या शिवसेना नगरसेविकेवर पालिका अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाचा ठराव स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याकडून सभागृहात मांडला गेला असता सर्व विरोधी सदस्यांनी यावर चर्चेची मागणी केली होती. मात्र ही मागणी धुडकावत महापौरांनी संबंधित ठराव सत्तेच्या जोरावर चर्चेविनाच मंजूर केला. अशा घटना वारंवार होत असल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांची गळचेपी होते आणि त्यामुळेच सभागृहात गदारोळ झाला. उपरोक्त घटनेच्या वेळी शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्याकडून काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली गेली, असा आरोप निकम यांनी केला आहे.
वास्तविक पाहता त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे महापौरांनी पालिका अधिनियमानुसार तत्काळ निलंबनाची कारवाई करणे आवश्यक होते; परंतु महापौरांनी त्या सदस्यांना पाठीशी घातल्याचे काम केले, असा आरोप निकम यांनी केला. गेल्या अनेक वर्षांच्या शिवसेनेचा इतिहास पाहता लोकशाहीचा गळा दाबून दादागिरी करणे हा त्यांचा अजेंडा आहे. पालिका सभागृहात शिवसेनेकडून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अशाप्रकारे सभागृहात वर्तन करणे हा सभागृहाचाही अपमान असल्याचे निकम यांनी सांगितले. उपरोक्त घटनांची सभागृहामध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांकडून या घटनेचा अहवाल मागवून असभ्य वर्तन करणार्या शिवसेना नगरसेविकेवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती ज्ञानराज निकम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment