मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग) पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी किंवा बोरिवलीच्या नॅशनल पार्क येथे स्थलांतरित करण्याचा घाट राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घातला आहे. मुंबई टुरिझम विकास आरखड्यात याबाबतचा उल्लेखही करण्यात आला आहे. मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी त्यास तीव्र विरोध दर्शवित स्थलांतराबाबत पुनर्विचार करावा याबाबतचे पत्र एमटीडीसीला पाठविले आहे.
राणी बागेतील प्राणिसंग्रहालयाला दीड शतकांचा वारसा असून पर्यटकांचे ते प्रेक्षणीय, आवडीचे स्थळ आहे. मुंबई मनपाने राणीच्या बागेची नव्याने पुनर्रचना करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय बनविण्यासाठी १५0 कोटी रुपये खर्च केले आहेत. यासंबंधी तज्ज्ञ सल्लागारांनी यापूर्वीच कार्यवाही सुरू केली असून आगामी काळात या संदर्भात निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिस्थितीत राणीची बाग स्थलांतरित करण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन पर्यटन महामंडळाला केले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment