मुंबई : विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी क्रमिक पाठय़पुस्तके, वह्यांसह २७ शैक्षणिक वस्तू देण्याचा पालिका प्रशासनाचा दावा पुरता फोल ठरला असून, शाळा सुरू होऊन एक महिना संपला तरी मुलांपर्यंत अजून वह्याच पोहचल्या नसल्याने मुलांचा अभ्यास वह्यांविनाच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसरीकडे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाऐवजी चिक्की देण्याची घोषणादेखील हवेतच विरल्याने विद्यार्थ्यांची मात्र ससेहोलपट होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्वभाषिक प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या घटत असल्याने, विद्यार्थ्यांची गळती रोखून विद्यार्थ्यांना पालिका शाळांकडे आकर्षित करण्याच्या उदात्त हेतूने पालिका प्रशासनाने आपल्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पाठय़पुस्तकांसोबतच सर्व प्रकारच्या वह्या, निबंध, प्रयोग, आलेख, एकरेघी, दुरेघी, गणवेश, दप्तर, शूज, बॉक्स, कलर बॉक्स, रेनकोट आदी २७ वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या योजनेचे पालकांनीदेखील स्वागत केले. वस्तू मिळणार म्हणून तळागाळातील अनेक विद्यार्थीही पालिका शाळांकडे आकर्षित झाले; पंरतु वस्तूंच्या पुरवठय़ातील अनियमितपणा आणि दर्जा याचे कोणतेच समीकरण न जुळल्याने या चांगल्या योजनेला गालबोट लागले आणि ही योजना सुरुवातीपासून वादाच्या भोवर्यात सापडली ते आजपर्यंत!
शाळा सुरू होऊन बरोबर एक महिना संपला. शाळांमध्ये अध्ययन अध्यायनाचे कामही नियमितपणे सुरू झाले; परंतु अजूनपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंंत वह्याच न पोहचल्याने वर्गात दिलेला अभ्यास कशावर लिहायचा हा विद्यार्थ्यांसमोर यक्षप्रश्न पडला आहे. बरे दरवर्षीप्रमाणे शाळेतून वह्यांसह सर्व वस्तू मिळणार ज्यांच्या ऐपत आहे अशाही पालकांनी बाहेरुन वह्या विकत घेतल्या नाहीत. वह्यांचे रेट बाजारात फारच असल्याने अनेकांना बाहेरुन वह्या विकत घेणे शक्य नसल्याने सध्या तरी पालिका शाळांत विद्यार्थ्यांंचा अभ्यास वह्याविनाच सुरू आहे. दुसरीकडे पाऊस सुरू होऊन दोन महिने संपत आले. ऑगस्टपासून पावसाचे प्रमाणही कमी होते. अशा परिस्थितीत पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून विद्यार्थ्यांंना देण्यात येणारे रेनकोटदेखील अजूनपर्यंंत अनेक शाळांपर्यंंत पोहचले नसल्याचे कळते. काही शाळांत मुलांसाठी रेनकोट आले पण मुलींसाठी अजून आले नसल्याने सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment