मुंबई - मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांच्या नस्ती (फायली) गहाळ होत असतानाच या खात्यांमध्ये रोज जमा होणारी रोख रक्कमही गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २००८ पासून मुंबईतील करदात्यांकडून वसूल केलेली ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा केली गेली नसल्याचा गौप्यस्फोट मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
या ४३७ कोटींच्या रोख रकमेचा हिशेब मुंबई पालिकेला अद्यापही देता येत नसून हा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही त्रुटी आहे की लबाडी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई महापालिकेत वाटमारी करत महापालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकारी करत असल्याचे आरोप यापूर्वी अनेकदा झाला आहे.
२००७ पासून महापालिकेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाले असून याच कालावधीत सुमारे अडीच हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे व्हेरिएशनही झाले होते. या विरोधात विधिमंडळ अधिवेशनातही आवाज उठवला गेला होता. पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालातून आपले पितळ उघडे पडेल या भीतीमुळे पालिका प्रशासनाने २००७ पासूनचे लेखा परीक्षणासाठी पाठवले नव्हते.
परंतु, आता महापालिकेने बनवलेल्या २००८च्या लेखा अहवालांमध्ये ४३७ कोटी रुपयांची ‘रोख रक्कम’ दाखवण्यात आली आहे. याच लेखा परीक्षण विभागाच्या टिप्पणीवरून आपण लेखा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही आपल्याला याचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे आपण याबाबत आयुक्तांनाच पत्र लिहून याची चौकशीची मागणी केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
२००८ सालापासून लेखा अहवालामध्ये ही ४३७ कोटी रुपयांची रक्कम रोख स्वरूपात दाखवली जात आहे. महापालिकेच्या नियमानुसार विविध विभागांमध्ये जमा झालेली रोख रक्कम ही बँकेत भरणे आवश्यक असते. या रोख रकमेतून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जात नाही. असे असताना ही ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम कोणत्याही बँकेच्या खात्यात का दाखवली गेली नाही, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. लेखा परीक्षकांनीच ही त्रुटी दाखवली असून महापालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध झालेल्या लेखा अहवालावरूनच ही बाब समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment