ईस्टर्न फ्री-वेच्या नामकरणाचा वाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2013

ईस्टर्न फ्री-वेच्या नामकरणाचा वाद

राष्ट्रवादीचे चेंबूर येथे आंदोलन
मुंबई : 'ईस्टर्न फ्री-वे'च्या नामकरणावरून सुरू झालेला वाद आता रस्त्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 'फ्री-वे'ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे नाव देण्यास विरोध केला असून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने चेंबूर येथे आंदोलन केले.

ईस्टर्न फ्री-वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. ईस्टर्न फ्री-वे तयार करताना येथे राहणार्‍या बहुतांश आंबेडकरी जनतेला विस्थापित व्हावे लागले होते. त्यामुळे या मार्गाला डॉ. आंबेडकर यांचे नाव देणे योग्य होईल, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मनसेने केलेल्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयने मात्र तीव्र विरोध केला आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चेंबूर येथे सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. या वेळी राज यांची पोस्टर्सही फाडण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी फ्री-वे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना अडवले.

फ्री-वेला कुणाचेही नाव नको - प्रकाश आंबेडकर
ईस्टर्न फ्री-वेच्या नामकरणावरून चांगलाच वाद रंगला असताना भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र फ्री-वेला कुणाचेही नाव देऊ नका, अशी भूमिका मांडली आहे. मुंबईमध्ये याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका मोठय़ा रस्त्याला देण्यात आलेले आहे. असे असताना पुन्हा एकदा रस्त्याला बाबासाहेबांचे नावे देण्याची मागणी करणे म्हणजे निव्वळ राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ राजकारणासाठी फ्री-वेला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी करीत आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad