काठमांडू - भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील लुंबिनी येथे संशोधकांना प्रगत गाव; तसेच विहारांचे अवशेष सापडले आहेत. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी लुंबिनी येथे स्मृतिविहारे बांधण्यापूर्वी हजारो वर्षे आधीचे हे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
""सम्राट अशोक यांनी भेट देण्यापूर्वीच्या लुंबिनीच्या इतिहासाचे ठोस पुरावे आम्हाला सापडले आहेत. नेपाळ सरकार या जागतिक मूल्य असलेल्या स्थळाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे,'' असे नेपाळच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव सुशील घिमिरे यांनी सांगितले. आतापर्यंत सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी लुंबिनी येथे बांधलेले स्तंभ आणि विटांचे विहार वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. "युनेस्को'ने 1997 मध्ये या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
मात्र, आता लुंबिनी येथे ख्रिस्तपूर्व 1300 मधील खेड्याचे अवशेष सापडले आहेत. भगवान बुद्धांच्या जन्म ठिकाणापासून दक्षिणेकडे काही अंतरावर हे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे या प्रदेशाची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाल्याचा पुरावा मिळाला आहे. ""दक्षिण आशियामध्ये पहिल्यांदाच अशोकपूर्व काळातील विटांनी बांधलेल्या विहाराचे अवशेष सापडले आहेत,'' असे ब्रिटनमधील डहरॅम विद्यापीठातील संशोधक बॉबन कनिंगहॅम यांनी सांगितले. जपानने अर्थसाहाय्य दिलेल्या "युनेस्को'च्या प्रकल्पांतर्गत लुंबिनी येथे उत्खनन करण्यात आले. यामध्ये नेपाळी संशोधकांसह आंतरराष्ट्रीय संशोधक सहभागी झाले होते.
भगवान बुद्धांचे जीवन आणि लुंबिनीचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेण्यासाठी हा शोध उपयोगी ठरणार आहे. असे लुंबिनी विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष आचार्य कर्मा सांगो शेर्पा यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment