गलिच्छ वस्ती सुधारणा.........
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्वरित या कामांकरिता सल्लागारांची नेमणूक करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, यासाठी विभागीय सहाय्यक आयुक्तांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती सभागृह नेते यशोधर फणसे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. एकात्मिक गलिच्छ वस्ती विकास कार्यक्रमांतर्गत सल्लागारांची नेमणूक करून विविध विभागांमध्ये गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या २0१३-१४ च्या अर्थसंकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. तथापि अद्याप कोणत्याही विभागामध्ये या तरतुदीचा विनियोग करण्याच्या अनुषंगाने सल्लागारांची नेमणूक करण्यात आलेली नाही. काही कालावधीतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या जाणार असून डिसेंबर २0१३ पासून या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात विभागातील गलिच्छ वसाहतींमध्ये ही कामे होऊ शकणार नसल्याचे फणसे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनातर्फे या कामांकरिता सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, जेणेकरून आगामी वर्षात गलिच्छ वसाहतींमध्ये करावयाच्या कामांकरिता करण्यात येणार्या आर्थिक तरतुदीचा विनियोग सल्लागारांच्या अहवालानुसार करणे सोयीचे होईल, असे फणसे यांनी स्पष्ट केले. |
No comments:
Post a Comment