मुंबई : बुद्धगया येथील महाबोधी विहार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचे पडसाद मुंबईत उमटले असून बौद्ध धर्मीयांनी गट, तट आणि राजकीय पक्षांना बाजूला ठेवून एकदिलाने अनेक ठिकाणी, निदर्शने, मूक मोर्चा, कँडल मार्च काढून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याची निंदा केली. त्याचबरोबर जागतिक कीर्तीच्या देशभरातील बौद्ध स्थानांना सुरक्षा पुरविण्याची मागणी बुद्धप्रेमींनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात बोलताना भदंत डॉ. एन. आनंद महाथेरो, वीररत्न यांनी बुद्धगया येथील पवित्रस्थानाला बॉम्बस्फोटाने उडवून देणार्यांवर कारवाही करण्याची मागणी केली. आज हे विहार बौद्धांच्या ताब्यात असते तर असे स्फोट झालेच नसते असे सांगून केंद्र आणि बिहार सरकारने महबोधी विहार त्वरित बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी भिक्कू संघाने केली.
जगाला शांतीचा संदेश देणार्या गौतम बुद्ध यांच्या बुद्धगयेच्या महोबोधी विहार परिसरात रविवारी पहाटे एकामागोमाग ९ बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया मुंबई आणि उपनगरात उमटल्या. दादर, माटुंगा, खार, वांद्रे, कुर्ला, धारावी, चेंबूर, वडाळा, घाटकोपर, आझाद मैदान येथे बुद्धप्रेमींनी निदर्शने करून बॉम्बस्फोट करून पवित्र स्थान नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्यांचा निषेध केला. काही ठिकाणी मूक मोर्चे काढले, तर काहींनी पोलीस ठाण्यांना निवेदने सादर केली.
आझाद मैदान परिसरात मुंबई प्रदेश भिक्खूसंघाचे भिक्खूवीरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ विहार कृती समिती, रिपाइंचे गौतम सोनवणे, कीर्तीभाऊ ढोले, रिपाइं युवाचे रमेश गायकवाड, दिलीप गायकवाड, बुद्ध समाज उपासक-उपासिका संघाचे अध्यक्ष नितीनभाऊ मोरे आदींनी जागतिक कीर्तीच्या देशातील बुद्धस्थळांना संरक्षण, महाबोघी बुद्ध विहार बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांना अटक करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
घाटकोपर सर्वोदय हॉस्पिटल येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुकाप्रमुख संदेश मोरे, विजय वंजारी, संजय केदारे, साहेबराव वैरागद, रवी मोहिते आदींना याप्रकरणी निदर्शने करून चिराग नगर पोलिसांकडे निवेदन सादर केले.
बिहार येथील बुद्धगयाला बॉम्बस्फोटाने उडवून देणार्यांना त्वरित फासावर लटकवावे व महाबोधी महाबुद्धविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सचिव व भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशनचे संस्थापक अध्यक्ष भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो यांनी सोमवारी पत्रकार संघ येथे केली. या वेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशनचे पदाधिकारी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे पदाधिकारी यांनी आझाद मैदानात निदर्शने केली
No comments:
Post a Comment