मुंबई / प्रतिनिधी ( http://jpnnews.webs.com ( NEWS website ) )
जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्र या पत्रकारांच्या युनिअनच्या वतीने केलेल्या पाठपुराव्या मुळे मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
महाराष्ट्र शासनाकडे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून नोंद असलेल्या पत्रकारांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार घेण्याची सोय आहे. अशी सोय मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेकडून दिली जात नव्हती. अधिस्वीकृत पत्रकारांप्रमाणे पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत अशी मागणी मुंबईचे महापौर सुनील प्रभू, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, भाजपा गटनेते दिलीप पटेल, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांच्याकडे जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी केली होती.
युनिअनच्या मागणीची दखल पालिका आयुक्त सीताराम कुंटे तसेच विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी घेतली असून पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना त्वरित पालिका रुग्णालयात मोफत उपचार द्यावेत अशा सूचना अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांना केल्या आहेत. म्हैसकर यांनी मागण्याबाबतचे निवेदन पालिकेच्या रुग्णालये व आरोग्य विभागाच्या संचालिका सुहासिनी नागदा यांच्याकडे कारवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे लवकरच पालिकेमधील पत्रकारांना रुग्णालयात उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती युनिअनचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment