तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशारामुंबई - बंद असलेले इंडिकेटर आणि एटीव्हीएम मशीन, अपुर्या कर्मचार्यांमुळे एकाच खिडकीतून होणारी तिकीट विक्री त्यामुळे प्रवाशांचा होणारा खोळंबा, जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या पादचारी पुलावरून चालताना प्रवाशांना वाटणारी भीती... विद्याविहार रेल्वे स्थानकावरील समस्यांच्या या बजबजपुरीविरोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे. या समस्या तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना या स्थानकावरील अपुर्या सोईसुविधांमुळे नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. अखेर शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके आणि विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन या समस्यांवर वेळीच तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी चंदू चव्हाण, महेश जंगम, विलास लिगाडे, अजित लोणे, सचिन भांगे आदी उपस्थित होते.
समस्या- विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला ६ खिडक्यांचे तिकीटघर आहे. पण नेहमी यातील एकच खिडकी कार्यरत असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी तिकिटासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागतात.
- स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवाशांसाठी ३ एटीव्हीएम मशीन आहेत. मात्र त्यातील २ मशीन कायम बंद असतात.
- पश्चिमेकडील तिकीटघर आणि फलाट क्रमांक १ मधील दगडी भिंत अर्धवट कोसळली आहे.
- पूर्व-पश्चिमेला जोडलेला एकमेव पादचारी पूल जीर्ण झाला आहे.
- इंडिकेटर, उद्घोषणा या सेवा नियमित उपलब्ध नसतात शिवाय स्थानकाची नियमित सफाईदेखील होत नाही.
No comments:
Post a Comment