मुंबई- माहीम दर्ग्यासमोरील ‘अल्ताफ’ या मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग कोसळून ठार झालेल्यांची संख्या दहावर पोहोचली आहे. मृतांमध्ये सात महिला व तीन मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास अल्ताफ इमारतीचा काही भाग कोसळला. या पाच मजली इमारतीत एकूण १६ कुटुंबे राहत होती. यातील झेबुनिसा लाखा (७६), हलिमा शेख (७५), मेहरिनी बॅटरीवाला (६०) मोविन लाखा (१७), ताहिरा मर्चंट (७८), आनंद मितानी (१२), मरियम मितानी (७), आसिफा र्मचट, फरहान र्मचट, झेवा लाखा या दहा जणांना आपला जीव गमवावा लागला.
भरपावसात रात्री ही दुर्घटना घडल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलाचे जवान ढिगा-याखालील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. या घटनेत अग्निशमन दलाचा जवान विशाल मोरे याच्यासह सुनीलकुमार मिश्रा, शंकर भोईर, फरहाना लाखा, चाँदवी शेख व अन्य एक व्यक्ती जखमी झाली आहे.
माहीमच्या अल्ताफ इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि सर्व सदनिकांमधील नूतनीकरणाच्या कामामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. या बांधकामाविषयी पालिकेकडे तक्रार दाखल झाली नसल्याचा दावा पालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या इमारत व कारखाना विभागाच्या अधिका-यांनी केला. मात्र, पालिकेच्या अधिका-यांचा निष्काळजीपणा त्यांना भोवणार असल्याचे दिसत आहे.
निकृष्ट बांधकाम, पालिका अधिका-यांचे दुर्लक्ष, मारुती कारच्या शो रूमसाठी इमारतीच्या आराखडयात केलेला बदल आणि ३२ वर्षापासून या इमारतीची दुरुस्ती न झाल्याची परिणती ‘अल्ताफ’ इमारत कोसळण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment