मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 'फोटो काढा, खड्डे बुजवा' हे जे तंत्रज्ञान आणले आहे, त्याचे प्रशिक्षण प्रथम आपल्या अधिकारी, कर्मचार्यांना द्यावे, त्यानंतर याची सविस्तर माहिती जनतेला मिळण्यासाठी जनजागृती करावी, तरच मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या तक्रारी पालिका अधिकार्यांपर्यंत पोहोचतील आणि खड्डे बुजविण्याच्या कामास गती येईल, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले.
गेल्या १0 दिवसांतील मुंबईत पडलेल्या पावसाने रस्त्यांवर हजारो खड्डे पडले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत हिच परिस्थिती असते. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेणे आवश्यक असताना सत्ताधारी नेते चीनच्या दौर्यावर जातात. मात्र या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने पालिका प्रशासन तसेच सत्ताधारांच्या नियोजनाचे पितळ उघडे पडले, असे लांडे यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी असलेले खड्डे भरण्यासाठी वेळेवर ठेकेदाराची नेमणूक न झाल्याने तसेच पाऊस पडल्यानंतर त्यात भर पडलेल्या खड्डय़ांमुळे मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले असून करपात्र नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने जनतेलाच खड्डय़ांचे फोटो पाठविण्याचे सूचित केले असले तरी लोकांना या तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून तक्रारी प्राप्त होणे कठीण आहे. पर्यायाने रस्त्यावरील खड्डे तसेच राहत असल्याचे लांडे यांनी सांगितले. यासाठी जनतेला प्रशिक्षणाची गरज असून प्रशासनाने याकरिता पुढाकार घ्यावा, असे लांडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment