जकात नाक्यावरील दलालांची कार्यालये पालिका हटवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2013

जकात नाक्यावरील दलालांची कार्यालये पालिका हटवणार

मुंबई : जकात चोरी रोखल्यामुळे विधी समिती अध्यक्ष अँड़ मकरंद नार्वेकर यांना धमकावणार्‍या तसेच त्यांच्यावर हल्ला करणार्‍या जकात दलाल व जकात माफियांची जकात नाक्यावरील कार्यालये तातडीने हटवण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पालिकेने जकात नाक्यांवर नेमलेले जकात दलाल हे पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांशी संगनमत करून दररोज सर्रासपणे कोट्यवधी रुपयांची जकात चोरी करत असल्याचे निदर्शनास आल्यावर विधी समिती अध्यक्ष नार्वेकर यांनी २-३ वेळा धाड टाकून लाखो रुपयांची जकात चोरी पकडली. त्यामुळे संतप्त झालेल्या जकात माफियांनी नार्वेकर यांना पालिका मुख्यालयातील त्यांचा कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ६ जून रोजी पुन्हा जीव धोक्यात घालून त्यांनी जकात चोरी करणारे १९ ट्रक दादर येथे पकडले. या वेळी जकात माफियांनी ट्रकद्वारे त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबत पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, राज्य सरकारकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. मात्र अद्यापि जकात माफियांवर कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान, याचे तीव्र पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. भाजपाचे नगरसेवक व शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी जकात दलालांची मुदत संपली असून त्यांना मुदतवाढ न देता या दलालांची जकात नाक्यांवरील कार्यालये हटवण्याची मागणी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही जकात दलालांकडून लोकप्रतिनिधींना धमकावल्याचे प्रकार सातत्याने घडत असून या जकात दलालांना धडा शिकवण्यासाठी त्यांची कार्यालये ७ दिवसांत हटवा, अशी सूचना प्रशासनाला केली. यावर बोलताना अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा म्हणाले, जकात नाक्यांवरील जकात दलालांची मुदत संपली असून अद्यापि परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. या दलालांची कार्यालये एका आठवड्यात हटवली जातील व वीजपुरवठा खंडित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad