पहिल्याच पावसामध्ये पालिका प्रशासन नापास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2013

पहिल्याच पावसामध्ये पालिका प्रशासन नापास

विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
मुंबई : मुंबईतील पहिल्याच पावसाने पालिका प्रशासनाने केलेले सर्व दावे फोल ठरविले असून पावसाच्या पहिल्याच चाचणीत पालिका प्रशासन संपूर्णपणे फेल ठरले असल्याचा आरोप सोमवारी पालिका सभागृहात विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला. यापुढे संपूर्ण पावसाळ्यात प्रशासन मुंबईकरांना कशाप्रकारे दिलासा देणार याबाबत आयुक्तांनी सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी निकम यांनी या वेळी केली. 

गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भागात पाणी तुंबते, त्या ठिकाणी या वर्षीही पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याच; परंतु याव्यतिरिक्तही अनेक जागी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. यामुळे पर्जन्य जलवाहिन्या, नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा जो दावा प्रशासनाकडून केला जात होता, तो पूर्णपणे फोल ठरल्याचे चित्र आहे. मुंबईत १८0 ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी २२0 पंप बसविण्यात आले होते, मात्र त्यापैकी ७0 टक्केपंप बंदच होते. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली. नाल्यातील गाळ कंत्राटदारांनी काढल्याचे कागदावर प्रशासन दाखवत असले तरी हा गाळ कुठे टाकला, याचे उत्तर त्यांनी द्यावे. 

या वर्षी नालेसफाईचे टेंडर उशिरा काढल्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास १0 मे उजाडला. त्यानंतरही पालिकेने २५ टक्केनालेसफाई केल्याचा दावा केला. मात्र तो पावसाने खोटा ठरविला. त्यामुळे पालिकेचे पर्यायाने जनतेचे पैसे पाण्यात वाहून गेले. ओशिवरा नदीवर गेल्या पाच वर्षांत १९ कोटी, पोईसर नदीवर १५ कोटी, दहिसर नदीवर ६ कोटी आणि वाकोला नदीवर ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या नद्यांचे नाले झाले आहेत. त्यामुळे हाही खर्च वाया गेला आहे, असे निकम यांनी सांगितले. या वर्षी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नवी यंत्रणा आणण्यात आली असली तरी पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी असल्याने पालिका प्रशासन यावर काय उपाययोजना करणार याबाबत आयुक्तांनी सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी ज्ञानराज निकम यांनी केली. निकम यांच्या निवेदनावर बोलताना मनसेचे गटनेते दिलीप करंडे यांनी मुंबईत पाणी भरले असताना सत्ताधारी नेते चीनच्या दौर्‍यावर गेले होते, असा टोल देत सत्ताधार्‍यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad