मुंबई- घाटकोपर ‘एन’ विभागात तब्बल ३० ठिकाणी कधीही दरडी कोसळण्याची भीती मुंबई महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणा-या झोपडीवासीयांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसाही महापालिकेने बजावल्या आहेत. मात्र, ऐन पावसाळ्यात कुठे स्थलांतरित व्हायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याने त्यांना दरडींच्या छायेखालीच राहावे लागते आहे.
दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ३० ठिकाणांची यादी महापालिकेने ‘म्हाडा’च्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडे पाठवली आहे. ‘म्हाडा’ ही यादी जिल्हाधिका-यांकडे पाठवणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी व निधी मिळाल्यावर म्हाडा संरक्षक भिंतीचे काम हाती घेणार असल्याचे मुख्य अधिकारी आनंद रायते यांनी सांगितले. दरम्यान, संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंजुरी व त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतरच ‘म्हाडा’चे झोपडपट्टी सुधार मंडळ भिंतीचे काम हाती घेते. हा निधी वेळेत मिळत नाही, शिवाय पावसात भिंतीचे काम करणेही धोक्याचे असते. त्यामुळे या पावसातही रहिवाशांना धोकादायक दरडीखालीच जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.
धोकादायक दरडींची ठिकाणे
घाटकोपर पश्चिम येथील वर्षानगर, बोळेकर चाळ, काळभैरव, रामनगर, संजय गांधीनगर, राहुलनगर, गणेश ‘ब’ सिद्धिविनायक चाळ, गणेश ‘बी’ जय अंबेमातानगर, खंडोबा टेकडी, नेपाळी चाळ, सोनिया गांधीनगर, एकतानगर, प्रेमनगर, काजू टेकडी, आनंदनगर.
No comments:
Post a Comment