पावसाळ्यासाठी पालिका सज्ज ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2013

पावसाळ्यासाठी पालिका सज्ज ?

मुंबईत वेळी अवेळी पडणारा पाऊस या वर्षी वेळेवर सुरु झाला आहे. पाऊस म्हटले कि गटारे, नाले तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे, साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे, मुंबईची लाईफ लाईन बोलली जाणारी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बंद पडणे किवा धीम्या गतीने चालणे, विविध आजार होणे याचा अनुभव मुंबईकर नागरिकांना दर वर्षी येत असतो. पावसाळ्यामध्ये नागरिकांना पालिका व रेल्वे प्रशासनाचा सर्वात वाईट अनुभव येत असतो.  

मुंबई महानगर पालिकेने पावसाळ्यात दर वर्षी प्रमाणे ठिकठिकाणी पाणी साचू नये म्हणून पाणी साचणाऱ्या १८५ ठिकाणी २२० उदंचन पंप लावण्याची व्यवस्था केली आहे. मुंबईच्या ६ समुद्र किनाऱ्यावर सामान्य स्थिती मध्ये ४२ जीवरक्षक, ४६ कोळी जीवरक्षक तसेच विशेष भरतीच्या वेळी मुंबई अग्निशमन दलाची ६ पूर बचाव पथके, तर ३०० नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालिकेने १८ हजार ७५० झाडांची चटणी केली असून ७११ मृत धोकादायक झाडे पाडण्यात आली आहेत.मुंबई मध्ये गटारे नाले पावसामध्ये तुंबू नये म्हणून नालेसफाई पूर्ण करण्यात आली आहे.  

पावसाळ्याच्या दिवसात लेप्टोस्पायरेसीस, डेंग्यू, कावीळ, विषमज्वर इत्यादी रोगांच्या रुग्णांच्या संखेमध्ये कमालीची वाढ झालेली असते. २०१० मध्ये लेप्टोस्पायरेसीसचे १३५ रुग्ण होते २०१२ मध्ये त्यात वाढ होऊन लेप्टोस्पायरेसीसच्या रुग्णांची संख्या ३२७ झालेली आहे. २०१० मध्ये डेंग्यूचे ११५ रुग्ण होते त्यात २०१२ मध्ये त्यात वाढ होऊन डेंग्यूचे १००८ रुग्णांची नोंद झाली आहे. २००९ मध्ये ४४ हजार रुग्णांपैकी मलेरियाने १९८ लोकांचा मृत्यू झाला होता आता सुरु वर्षात मलेरियाचे ३३५२ रुग्ण आढळले असून मे पर्यंत ४ जणांचा मलेरियाने मृत्यू झालेला आहे असे पालिकेने कळविले आहे. यामुळे जलजन्य आजारांसाठी पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये ३१७७ तर अतिदक्षता विभागाच्या १३८ खाटा राखीव ठेवल्या आहेत. 

२००५ मध्ये ज्या मिठी नदीचे पाणी मुंबई मध्ये घुसून हाहाकार उडाला होता त्या मिठी नदी मधून आता पर्यंत ५ लाख ६८ हजार घनमीटर गाळ, कचरा काढण्यात आला आहे. मिठी नदीच्या बाजूच्या १० किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून ११२२ ब्बंध्कामे निष्कासित केल असून १६५५ बांधकामे निष्कासित करण्याची बाकी आहेत. मिठी नदी साठी पालिकेने अद्याप ५३१.७० कोटी रुपये खर्च केले आहे आहेत. मुंबई रेल्वेच्या हद्दीतील गटारे नाले साफ करण्यासाठी ५ कोटींचा निधी देण्यात आला असला तरी दरवर्षी प्रमाणे कुठेही नाले किवा गटारे सफाई होताना दिसलेले नाहीत. 

पालिकेने २३ ते २८ जून, २२ ते २६ जुलै, २० ते २३ ऑगस्ट व सप्तेम्बरचे १९ ते २१ हे दिवस अति धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. या दिवसांमध्ये समुद्रामध्ये मोठ्या लाटा येण्याची, तसेच भरती येण्याची शक्यता आहे.
यामुळे पालिकेच्या हद्दीमध्ये पाणी साचेल असे बोलले जात आहे.  

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने केली जाणारी नालेसफाई चांगली असल्याचे प्रमाणपत्र पालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले आहे. पालिकेमधील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने नाले सफाई बाबत चांगले उद्गार काढले असले तरी येणाऱ्या काळात किती चागली सुविधा पालिकेने केली आहे हे लोकांच्या समोर नक्कीच येईल. गेले काही वर्षे अवेळी पडणाऱ्या पावसामध्ये थोडासा पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी साचणे, नाले गटारे तुंबणे यासारखे प्रकार झाले आहे. यावर्षी मात्र पाऊस भरपूर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामुळे पालिकेतील सत्ताधारयानी, प्रशासनाने पावसाच्या तयारी साठी केलेले प्रयत्न कमी पडतील अशी चर्चा सध्या मुंबईकरांमध्ये आहे. 

गेले काही वर्षे पाऊस कमी पडत असल्याने पावसाचे पाणी वाया जात असे. हे वय जाणारे पाणी वाचवावे म्हणून रेन हार्वेस्टिंग हि संकल्पना राबविण्यात आली होती. परंतु रेन हार्वेस्टिंग हि संकल्पना म्हणावी तशी राबविण्यात आलेली नाही. याच रेन हार्वेस्टिंग बाबत पालिका प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी असे निर्देश महापौर सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. परंतु अशी श्वेतपत्रिका आजही नागरिकांच्या समोर आणण्यात आलेली नाही. यामुळे यावर्षीही पावसाचे पाणी फुकटच जाणार असेच म्हणावे लागेल. 

पालिकेने केलेल्या दाव्यानूसार या वर्षी चांगली नालेसफाई झाली आहे यामुळे गटारे नाले तुंबणार नाहीत, रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जाणार आहेत, पाण्याचा निचरा करण्यासाठी जास्त पंपांची व्यवस्था केल्याने रस्त्यावर किवा विभागामध्ये पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होणार नाही असे पालिका प्रशासनाने व सत्ताधारयानी दावे केलेले आहेत. सदर लेख लिहिताना मुंबई मध्ये मुसळधार पाऊस सुरु असून या पावसामुळे कित्तेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने आपण सज्ज असल्याचा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. 09969191363

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad