मुंबई मध्ये गेले कित्तेक वर्षे पाऊस वेळेवर आला नव्हता यामुळे पाऊस कधी येईल अशी वाट मुंबईकरांना पाहत बसावी लागत असे. परंतू मुंबई मध्ये या वर्षी पाऊस जूनच्या सुरुवाती पासून दाखल झाला असून या वर्षी चांगला दमदार पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला असतो तो कधीच खरा नसतो असे सर्वत्र चर्चिले जात असताना कधी नव्हे ते या वर्षी मात्र हा अंदाज खरा ठरत आहे.
मुंबई मध्ये पावसाची सुरुवात होताच मुंबई मध्ये कित्तेक ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे, वाहतुकीचा खोळंबा होत असल्या कारणामुळे, रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे मुंबईकर नागरिक दरवर्षाप्रमाणे त्रस्त झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेने आणि रेल्वे प्रशासनाने कितीही नाले सफाईचे दावे केले असले तरी हे दावे फोल ठरले आहेत.
पालिका व रेल्वे प्रशासन हि नाले सफाई मुंबईकर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून करते कि कंत्राटदाराला त्याचे घर भरता यावे व कंत्राटदाराला खुश करून चिरीमिरी रक्कम आपल्यालाही मिळावी या हेतूने हि नाले सफाई केली जाते का असा प्रश्न सध्या प्रत्येक मुंबईकर नागरिकाच्या मनामध्ये आहे. पालिकेने नाले सफाई शंभर टक्के झाली आहे असे बोलले जात असतानाही मुंबई मध्ये सतत पाणी का साचत आहे असा प्रश्न प्रत्येक मुंबईकर नागरिकांकडून विचारला जात आहे.
नाल्यांची सफाई झाली कि नाही याची पालिका आयुक्त सीताराम कुंटे, महापौर सुनील प्रभू, स्थायी सामिती अध्यक्ष राहुल शेवाळे तसेच पालिकेमध्ये गेली १७ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत पाहणी केली आहे. या सर्वांनी नाले सफाई योग्य प्रकारे झाली असल्याचे म्हटले होते. इतक्या मोठ्या लोकांनी नाले सफाई योग्य असल्याचे म्हटले असताना मुंबईमध्ये पाणी का साचले असा सवाल प्रत्तेक मुंबईकर उपस्थित करत आहे. या सर्वांनी मुंबईकर नागरिकांना उत्त्तर देण्याची गरज आहे.
मुंबई महानगर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनीही पत्रकार परिषदेमध्ये मुंबईची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे कि येथे काही ठिकाणी पाणी तुंबणारच, पाणी साचणार नाही असा दावा आम्ही कधीही केला नाही असे सांगितले आहे. याचाच अर्थ मुंबई मध्ये कितीही करोडो रुपये खर्च करून नाले सफाई केली तरी पाणी साचणार असेल तर नाले सफाई बरोबरच पाणी साचणार नाही यासाठी पालिकेने वेगळ्या उपाय योजना करण्याची गरज आहे. पाणी साचू नये म्हणून, पाणी साचणाऱ्या ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये म्हणून नव्या उपाय योजना करण्यास सध्या पालिका कमी पडली आहे असेच म्हणावे लागेल.
मुंबई मध्ये कमी पाऊस पडला तरी मुंबई मध्ये पाणी साचत असल्याने येत्या चार महिन्यात मुंबईकरांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जूनच्या २३ ते २८, जुलैच्या २२ ते २६, ऑगस्टच्या २० ते २३ व सप्टेंबरच्या १९ ते २१ या दिवसांमध्ये समुद्राला भारती येणार असून यावेळी ४.५ फुटांपेक्षा मोठ्या लाटा समुद्रामध्ये येणार आहेत. मुंबई मध्ये पडणार्या पावसाचे पाणी नाल्यांच्या मधून समुद्राला जाऊन मिळते परंतु या दिवसांमध्ये समुद्राच्या पाण्याचा स्तर उंच असल्याने मुंबईचे पाणी समुद्रात जाणार नाही ते पाणी मुंबई मधेच साचून राहणार आहे, यामुळे या जाहीर किलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत जर पाऊस पडला तर संपूर्ण मुंबई जलमय झालेली असेल.
मुंबई मध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे. पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसताना जूनची २३ तारीख सुद्धा जवळ येत चालली आहे. २००५ मध्ये २६ जुलैला जो अनुभव मुंबईकर नागरिकांनी घेतला आहे तसा अनुभव या समुद्राला भरती असणाऱ्या दिवशीही मिळणार अशी भीती मुंबईकर नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई मध्ये सध्या कमी पावसात जर इतक्या ठिकाणी पाणी साचते तर भरतीच्या वेळी मोठा पाऊस आला तर किती हाहाकार उडेल याचा पालिका विचार करणार आहे कि नाही.
मुंबई मध्ये सतत पाऊस सुरु असल्याने मुंबई मध्ये पावसाचे पाणी साचत आहे. येणाऱ्या दिवसात समुद्रामध्ये मोठी भरती असल्याने मुंबई मध्ये पावसाचे पाणी साचून मुंबई जलमय होणार हे नक्की आहे. मुंबई जलमय झाल्या नंतर पालिकेला कधी जाग येईल तेव्हा येईल, पालिकेची मदत व बचाव पथके मुंबईकरान पर्यंत पोहोचतील किवा पोहोचणार हि नाहीत, पण प्रत्येक मुंबईकर नागरिकांनी येणाऱ्या पावसाच्या दिवसात तयारीत राहून २६ जुलै २००५ मध्ये जशी इतरांना मदत केली तशीच मदत इतरांना करायला तयार राहण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो.-09969191363
No comments:
Post a Comment