पालिका शाळांची घंटाही १७ जूनलाच वाजणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2013

पालिका शाळांची घंटाही १७ जूनलाच वाजणार

मुंबई : राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकाच दिवशी सुरू करण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागानेही आपल्या सर्व शाळा १३ जूनऐवजी १७ जून रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रकही पालिका शिक्षणाधिकार्‍यांनी जारी केले आहे.

राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे २0१३ पासून उन्हाळी सुट्टी सुरू झालेली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार प्राथमिक शाळा १३ जून रोजी, तर माध्यमिक शाळा १५ जून रोजी उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणार होत्या. तशा प्रकारच्या सूचना शाळांकडून उन्हाळी सुट्टीपूर्वी पालकांना देण्यात आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणार्‍या सर्वभाषिक प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांना अनुक्रमे १२ व १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे पालिकेच्या अखत्यारितील शाळा १३ व १५ जून रोजी सुरू होणार होत्या.

राज्यभरातील सर्व शाळा उन्हाळी सुट्टीनंतर उघडण्याबाबत एकवाक्यता यावी, या हेतूने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व शाळा एकाच दिवशी म्हणजे उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, १७ जून रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनानेदेखील आपल्या अखत्यारितील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा १७ जून रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पालिका शिक्षणाधिकार्‍यांनी तसे ईओसी/ओडी/१२/ दि. 0१.0६.२0१३ रोजीच्या क्रमांकाने परिपत्रक जारी केले असून, ते सर्व प्रशासनाधिकारी (शाळा) यांना कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad