शरद राव यांची मुजोरी कायम
मुंबई- सर्वसामान्य मुंबईकरांना छळणारे कामगार नेते शरद राव यांची मुजोरी कायम असून, सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा आपला निर्णय ठाम असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले. रिक्षाचालकांसह बेस्ट व पालिका कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच राव यांनी संपाचा निर्णय ठाम ठेवल्याने मुंबईकरांचे हाल-बेहाल होणार आहे.
या संपात दोन लाख रिक्षाचालक, ९० हजार पालिका कर्मचारी आणि ३० हजार बेस्ट कर्मचारी सहभागी होणार आहेत. राव यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असतानाही त्याची पर्वा न करता त्यांनी संप हा होणारच अशी भूमिका घेतली आहे. संप झाल्यानंतर लोकांचे काय होणार या प्रश्नाचे अचूक उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. जे रिक्षा चालक मुजोरी करतात, त्यांच्याबाबतही ते कधी बोलत नाहीत. त्यामुळे हा संप पुकारणे म्हणजे मुजोरीच असल्यासारखे आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता संघटनेची सभा घेणार आहेत. तोपर्यंत संपाबाबत तोडगा निघाला नाही, तर संप हा होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद राव यांच्या ‘कामगार कर्मचारी कृती समिती’ने पुकारलेल्या संपाचा फटका मुंबईतील रुग्णसेवेलाही बसण्याची शक्यता आहे. या संपात परिचारिकांसह पालिका रुग्णालयांमधील विविध पदांवर काम करणारे शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment