राज व उद्धव यांनी एकत्र येऊ नये - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2013

राज व उद्धव यांनी एकत्र येऊ नये - आठवले

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये येण्याचे निमंत्रण देणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज घूमजाव करत मनसेने महायुतीमध्ये येऊ नये, अशी भूमिका मांडली. मनसे महायुतीमध्ये आल्यास महायुतीला फटका बसेल असे ते म्हणाले. उद्धव व राज ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही व त्यांनी एकत्र यावे असेही वाटत नाही. उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे व आपली बैठक होईल व त्यामध्ये मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनसे नेतृत्वाची वारंवार भेट घेऊ नये अन्यथा महायुतीमध्ये मतभेद निर्माण होईल, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला. मनसेला निमंत्रण देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेवर "सामना'ने खरमरीत शब्दांत टीका केली होती. आता शिवसेना नेते रामदास कदम यांच्या राज व उद्धव यांनी एकत्र यावे, या आवाहनाचा व भाजप नेत्यांच्या राज भेटीचा "सामना'ने समाचार घ्यावा, असे त्यांनी शिवसेनेला सुनावले. मनसेला सोबत घेण्याविषयी भाजप आग्रही आहे, मात्र राज ठाकरेंच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा या निर्णयाला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय त्यांचा असून हा अधिकार इतरांना नाही. रेसकोर्सच्या जागेचा भाडेकरार राज्य सरकारने वाढवून देऊ नये व त्या जागेवर थीम पार्क उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय महिनाभरात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मलिक यांनी नाक खुपसू नये आमच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आमच्यात नाक खुपसू नये. त्यांनी आपले प्रवक्तेपद सांभाळावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला. पूर्व मुक्त मार्गाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने आधी केली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ मागणी करण्याऐवजी नाव देण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 

आठवलेंचा इशारा इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात झाली नाही तर पक्षातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आठवलेंनी दिला. इंदू मिलसंदर्भात राज्य सरकारने त्वरित समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad