पोयसर नदीवरील पुलास विलंब - स्थायी समिती सभा तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2013

पोयसर नदीवरील पुलास विलंब - स्थायी समिती सभा तहकूब

मुंबई : कांदिवली (प.) गावठण येथे पोयसर नदीवरील पुलाच्या कामात विलंब होत असल्याने पर्यायाने येथील जनतेला त्याचा नाहक त्रास होत आहे. या पुलाच्या कामास विलंब करणार्‍या पालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका माजी महापौर शैलजा गिरकर यांनी स्थायी समिती तहकुबीची मागणी केली. यावर अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढत या मागणीला पाठिंबा दिल्याने स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी स्थायी समिती सभा तहकूब करत संबंधित अतिरिक्त आयुक्तांकडे असलेल्या कामांबाबत आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. 

पोयसर नदीवरील पुलाचे बांधकाम पाच वर्षे झाली तरी पूर्ण होत नसल्याने शैलजा गिरकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सभा तहकुबी मांडली. यावर प्रशासनाकडून दिलेल्या लेखी उत्तरात तांत्रिक माहिती देण्याऐवजी एलबीटीच्या संपामुळे तसेच स्वत: गिरकर यांनी गणेशोत्सव काळात या पुलाचे काम थांबवण्याबाबत केलेल्या विनंतीचे कारण देत पुलाच्या कामास विलंब झाल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या उत्तरामुळे सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

सदस्यांच्या भावना लक्षात घेत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही या पुलाचा विलंबास कंत्राटदाराची आणि प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. ज्या अतिरिक्त आयुक्तांच्या अखत्यारित हा विभाग आहे त्यांच्या कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचा निषेध करणे योग्यच असल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण स्वत: पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी अधिकार्‍यांच्या अखत्यारितील सर्व विषयांवर चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे स्पष्ट केले.

अतिरिक्त आयुक्त असिम गुप्तांना निलंबित करा - कोटक
भाजपाचे नगरसेवक मनोज कोटक यांनी पोयसर नदीवर पुलाच्या विलंबास अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता हेच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. पुलाचे डिझाईन मंजूर करून घेण्यास विलंब का झाला असिम गुप्ता यांच्या भूमिकेमुळेच तांत्रिक निर्णय वेळेवर होत नाहीत. अशा प्रकारे विकासकामांना ठप्प करण्याचे काम गुप्ता यांच्यासारखे अधिकारी करत असतात आणि नाहक लोकप्रतिनिधींना टीका सहन करावी लागते. अशा अधिकार्‍यांची मस्ती उतरवली पाहिजे. प्रशासनाकडून दिलेल्या उत्तरात नगरसेवकाचेच नाव गुंतवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी कोटक यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad