१00 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
|
मुंबई : यंदाच्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका पहिल्यांदाच १00 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. हे कॅमेरे आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले असून त्यामुळे ज्या चौकांमध्ये पाणी साचेल, त्याचे चित्रीकरण आता थेट पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यानुसार त्या चौकातील पाणी उपसण्यासाठी पालिकेची यंत्रणा लगेचच कार्यान्वित करता येईल. त्यामुळे पाण्याचा निचरा लगेचच होईल, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी सुखद जावा म्हणून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधांविषयक कामे पूर्ण केली असून नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये येणार्या नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षांची आयुक्तांनी दुपारी पाहणी केली. त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. पालिका आयुक्त पुढे म्हणाले की, पालिका प्रशासनाला शक्य होईल, त्या-त्या मोठय़ा नाल्यांतील गाळ तळापर्यंत काढण्यात आला असून ही सर्व कामे ७ जून २0१३ रोजी पूर्ण होतील. तसेच मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात साचलेले पाणी काढण्यासाठी १८५ ठिकाणी २२0 उदंचन पंप बसवण्यात आल्याचेही पालिका आयुक्तांनी या वेळी सांगितले. यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होऊन चार दिवस झाले असून तो आता सध्या दक्षिण कर्नाटकच्या सीमेवर कार्यरत आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये हवामानात काही आमूलाग्र बदल झाला नाही तर ३ ते ४ दिवसांमध्ये हा मान्सून मुंबईत कार्यरत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मिठी नदीची पालिकेने हाती घेतलेली सफाई मोहीम वेगात सुरू असून ती कार्यवाही येत्या ३ ते ४ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) मनीषा म्हैसकर यांच्यासमवेत पाहणी केली. आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी महापालिका आयुक्तांना आपत्कालीन नियंत्रण कक्षात येत्या पावसाळ्यासाठी सुसज्ज केलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती दिली. |
No comments:
Post a Comment