‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’मध्ये खांदेपालट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2013

‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’मध्ये खांदेपालट

आठवले गटाकडे 35 वर्षांनंतर कारभार
मुंबई - धम्म प्रचारासाठी कार्यरत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत खांदेपालट झाला आहे. सोसायटीचा कारभार पाहणार्‍या भैयासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी मीराताई यांची निवड उच्च न्यायालयाने रद्द ठरवली असून रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचे नेतृत्व मानणारे ट्रस्टी यापुढे कारभार पाहणार आहेत.

धम्म प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 मध्ये या सोसायटीची स्थापना केली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर संस्थेचा कारभार त्यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या हाती आला. मात्र, त्यांचे 1977 मध्ये निधन झाल्यानंतर भैयासाहेब यांच्या पत्नी मीराताई काम पाहू लागल्या; परंतु मुंबई धर्मादाय आयुक्तांनी मीराताईंची निवड रद्द ठरवली. तसेच संस्थेचा कारभार पाहण्यासाठी 1980 मध्ये सात विश्वस्तांची नेमणूक केली. मीराताई यांनी धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला मुंबई शहर दिवाणी न्यायालयात आव्हान दिले; परंतु धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या विश्वस्तांनी 1987 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली 35 वर्षे या संस्थेचा वाद उच्च न्यायालयात चालू होता.

अखेर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या विश्वस्तांनी कारभार पाहावा, असा निकाल दिला. काही विश्वस्तांचे निधन झाले आहे. या निकालानंतर इतर विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांकडे नव्या सदस्यांच्या निवडीचा अर्ज सादर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मीराताई मातोश्री आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील वर्चस्वावरून आठवले आणि आंबेडकर गटामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटीची आता भर पडली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad