उत्तराखंडा मध्ये महापूर येवून तेथील जनजीवन अस्थव्यस्थ झाले आहे. उत्तराखंड मध्ये जो काही महापूर आला व या महापुरामध्ये जे लोक वाहून गेले, मृत्यमुखी पडले त्यांच्या बद्दल सर्वाना सहानभूती आहे. परंतू असे का झाले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. उत्तराखंडामध्ये ज्या ठिकाणी महापूर आला त्या ठिकाणी हिंदू धर्मियांचे केदारनाथ हे पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी गेल्यावर आपली पापे धुतली जातात म्हणून आयुष्यभराची कमाई घेवून लोक या ठिकाणी यात्रे साठी जातात.
असेच लाखो यात्रेकरू केदारनाथ येथे असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडामध्ये सर्वत्र महापूर येवून या पूरातल्या बळींची संख्या ५५० च्या वर पोहाचली आहे. पण मृतांचा खरा आकडा काही हजारांच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होतेय. बचावकार्य पूर्ण झाल्यावरच हा आकडा समोर येईल. अडकलेल्या तेहेतीस हजार लोकांपेक्षाही जास्त लोकांची सुटका करण्यात आली असली तरीही पन्नास हजांराहून अधिक लोक अजूनही राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत.
उत्तराखंडमध्ये 1100 लहान मोठे रस्ते आणि मोठे महामार्ग उद्धवस्त झालेत. तर 94 पूल वाहून गेलेत. एकट्या रुद्रप्रयागमध्ये 26 पूल वाहून गेले. संपूर्णपणे सुरळीत होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधीही लागू शकतो अशी माहिती उत्तराखंड सरकारनं दिली. आतापर्यंत 33 हजार लोकांना वाचवण्यात यश आलंय. पण अजून 55 हजार लोकांना वाचवण्याचं आव्हान कायम आहे.
उत्तराखंडमध्ये महापूरामध्ये इमारती, मंदिरे, जनावरे, माणसे पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. माणसावर इतके मोठे संकट आले असताना ज्या देवाच्या यात्रेसाठी लोक गेले होते असे कोणतेही देव या महापुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी धावून आलेला नाही. महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचण्याचे काम भारतीय सैन्याने केले आहे, यामुळे महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी कोणतेही देव आले नाहीत, तर या माणसांना वाचवण्याचे काम सैनिकांनी केले आहे याची नोंद घेणे गरजेचे आहे.
हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या केदारनाथ मध्ये मोठ्या प्रमाणात देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना मुर्ख बनवण्याचे धंदे उघडण्यात आले होते. मंदिराच्या बाजूला बेकायदेशीर दुकाने, भाविकांना राहण्यासाठी हॉटेल बनवण्यात आली होती. सदर परिसर हा डोंगराळ असल्याने मोठ्या पावसामुळे पाण्याला वाट न मिळाल्याने पावसाच्या पाण्याने समोर येईल त्या बांधकामाला आपल्या पोटात घेत सर्व परिसर पाण्याने व्यापून टाकला होता. डोंगरावर जास्त बांधकाम झाल्यामुळे डोंगराची भार उचलण्याची ताकद संपली होती. यामुळे डोंगर खचले आणि जास्त प्रमाणात हानी झाली आहे.
उत्तराखंड मधील प्रकार बघितल्यावर मुंबई मध्ये २६ जुलै २००५ चा दिवस डोळ्यासमोर आला. मुंबई मध्ये सुद्धा मिठी नदीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम झाल्यामुळे मिठी आदि मधील पाण्याला वाट न मिळाल्याने हे पाणी मुंबई मध्ये शिरून मुंबई मध्ये पाणी साचून हाहाकार उडाला होता. असाच हाहाकार सध्या उत्तराखंड मध्ये उडाला आहे. उत्तरखंडामध्ये जे काही झाले ते अनधिकृत बांधकामामुळे झाले. अनधिकृत बांधकामे नसती तर आज इतका मोठा हाहाःकार झालाच नसता.
उत्तराखंड मध्ये हाहाकार उडाला असतानाच मुंबई मध्ये सुद्धा पावसाचे पाणी साचून जन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई मध्ये पडणाऱ्या पावसामुळे पालिकेने चांगली नाले सफाई झाल्याचे सांगितले असले तरी रस्त्यांवर सतत पाणी साचत आहे. रस्त्यांवर करोडो रुपये खर्च केले असले तरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. १० जून रोजी माहीममध्ये चार मजली इमारत कोसळून १० लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबई मध्ये रस्त्यांवर साचणारे पाणी, रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यात इमारती पडण्याच्या झालेल्या घटना पाहता मुंबईचे नगरसेवक या प्रश्नावर पालिकेमधील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरतील असे वाटले असतानाच पालिकेमधील शिवसेनेच्या सत्ताधार्यांनी पालिका सभागृहामध्ये मुंबईकरांच्या प्रश्नावर उत्तरे द्यावी लागतील म्हणून उत्तराखंड मधील महापुराचे कारण देत पालिका सभागृह तहकूब केले. यामुळे मुंबईकराच्या कोणत्याही प्रश्नावर पालिका सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही.
उत्तराखंड मध्ये महापूर आला व या महापुरामध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले आहे कित्तेकांचा म्रुत्यु झाला असताना पालीकेमधील साताधार्यानी शोक व्यक्त करून सभा चालवली असती, पावसामध्ये साचणाऱ्या पाण्याबाबत, रस्त्यावरील खड्यांबाबत, कोसळणाऱ्या इमारती बाबत, पावसामुळे मुंबई मध्ये फैलावणाऱ्या आजारांबाबत चर्चा केली असती तर मुंबईकर नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत पालिका व पालिकेमधील सत्ताधारी जागरूक आहेत असा संदेश मुंबईकर नागरिकांपर्यंत गेला असता.
परंतू अशी चर्चा घडवून आणल्यास विरोधक नाले सफाई, रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामात होणारा भ्रष्टाचार यावर तुटून पडतील या भीतीने पालिका सभागृहामध्ये चर्चा होऊ नये म्हणून सत्ताधार्यांनी पळकुटी भूमिका घेतली आणि सभागृह उत्तराखंडाच्या नावाने तहकूब केले असेच म्हणावे लागेल. सत्ताधार्यांनी सभागृह तहकूब केल्याने सत्ताधार्यांची अब्रू काही वेळा पुरता तरी वाचली असली तरी, पालिकेतील इतर नगरसेवकांना मुंबईकर नागरिकांच्या समस्या बाबत चर्चा करायची होती अशी चर्चा होऊ शकली नसल्याने या नगरसेवकांचा अमुल्य वेळ सत्ताधार्यांनी वाया घालवून मुंबईकर नागरिकांबाबत आम्ही किती जागरूक आहोत याचा संदेश मुंबईकर नागरिकांना दिला आहे.
अजेयकुमार जाधव
मो. 09969191363
No comments:
Post a Comment