मुंबई : रेल्वेचे महसूल वाढविण्यासाठी महत्त्वाच्या एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांचे दर येत्या काळात वाढू शकतात. रेल्वे बोर्डासमोर या संबंधीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाद्यपदार्थांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी) रेल्वेतील खाद्यपदार्थांचा पुरवठा करते. या बदल्यात रेल्वे प्रशासन आयआरसीटीसीला संपूर्ण खर्च देते. मेल आणि एक्स्प्रेसमध्ये पुरविण्यात येणार्या खादपदार्थांच्या दरात गेल्या १0 वर्षांत कोणतीही वाढ करण्यात आली नाही आहे. मात्र महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांचे दर वाढविण्यात यावे, यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या कॅटरिंग समितीने मांडला आहे. एसी टू टायर, एसी थ्री टीयर एसी आणि चेअर कारमध्ये खाद्यपदार्थांचे दर शंभर रुपयांची वाढविण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. एसी फस्र्ट आणि एक्झिक्युटिव्ह वर्गासाठी ३0 रुपयांची दरवाढ यामध्ये प्रस्तावित आहे. रात्रीचे जेवण पुरविण्यात येणार्या एक्स्प्रेसमध्ये चहा घेणार्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. अशा एक्स्प्रेसमधील चहाचे दर घटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राजधानी, दुरांतो वगळता अन्य एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांचे दर वाढविण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित एक्स्प्रेसमध्ये दरवाढीची अंमलबजावणी करण्यात यावी, असे कॅटरिंग समितीचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment